
जगभरातील दिग्गज शटलर्सच्या संघर्षाला सोमवारपासून (दि.१७) राजधानी दिल्लीत प्रारंभ होत आहे. १७ वर्षांनंतर हिंदुस्थानात बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा होत असून, १७ ते २३ ऑगस्टदरम्यान इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये जगज्जेतेपदासाठी शटलर्समध्ये रणसंग्राम होणार आहे.
हिंदुस्थानने २००९नंतर प्रथमच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले आहे. सात दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पुरुष व महिला एकेरीत प्रत्येकी ६४ खेळाडू, तर तीन दुहेरी प्रकारांत प्रत्येकी ४८ जोड्या विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. जागतिक स्पर्धेत हिंदुस्थानचा इतिहासही दमदार आहे. १९८३ मध्ये प्रकाश पदुकोण यांनी कांस्यपदक जिंकून हिंदुस्थानचे खाते उघडले. त्यानंतर २०११ पासून हिंदुस्थानने प्रत्येक आवृत्तीत किमान एक पदक पटकावले आहे. सलग ११ स्पर्धांमध्ये हिंदुस्थानच्या खात्यात तब्बल १४ पदके जमा झाली आहेत.
आयुष शेट्टीसमोर जगज्जेत्याची कसोटी!
पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत हिंदुस्थानचा युवा शटलर आयुष शेट्टी आणि विद्यमान विजेता, अव्वल मानांकित चीनचा शी युकी यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे शेट्टीसमोर सुरुवातीलाच मोठी कसोटी उभी ठाकली आहे.
महिला एकेरीत माजी विश्वविजेती पी. व्ही. सिंधू पुन्हा एकदा जेतेपदाच्या शर्यतीत उतरली आहे. महिला एकेरीत सर्वाधिक विश्व अजिंक्यपद पदकांच्या संयुक्त विक्रमाची मानकरी असलेल्या सिंधूचे लक्ष्य यावेळी सहाव्या पदकावर आहे.
हिंदुस्थानचे आव्हान
पुरुष एकेरी: लक्ष्य सेन, आयुष शेट्टी
महिला एकेरी पी. व्ही. सिंधू, उन्नती हुड्डा
पुरुष दुहेरी सात्विकसाईराज रंकीरेड्डी/चिराग शेट्टी, हरिहरन अमसाकरुणन/एम. आर. अर्जुन.
महिला दुहेरी : ट्रेसा जॉली/गायत्री गोपीचंद, कविप्रिया सेल्वम सिमरन सिंघी.
मिश्र दुहेरी ध्रुव कपिला/तनीषा क्रास्टो, रोहन कपूर/ऋत्विका शिवानी गड्डे.


























































