इम्रान खान यांना दोन दिवसांत रुग्णालयात दाखल करा; पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, बहिणींची भेट हा त्यांचा नैतिक अधिकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुरुंगात कैद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पुढील 48 तासांमध्ये शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. इम्रान खान यांच्या प्रकृतीची तपासणी आणि उपचारांसाठी वैद्यकीय पथक स्थापन करण्याचे निर्देशदेखील न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिले आहेत.

इम्रान खान यांना तोषाखाना भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगवास ठोठावण्यात आला होता. ते वर्ष 2023पासून अडियाला तुरुंगात आहेत. तुरुंगात त्यांचा छळ झाल्याचा आरोप करण्यात येत असून त्यांची प्रकृतीदेखील अत्यंत गंभीर असल्याचे त्यांच्या बहिणींनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने आज इम्रान खान यांना रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश देताना पाकिस्तान सरकारला फटकारले. बहिणींची भेट घडवून आणणे म्हणजे कोणतेही उपकार नाहीत, तो त्यांचा नैतिक अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हटले.

इम्रान यांच्या प्रकृतीबाबत चिंता

न्यायालयाने अडियाला तुरुंग प्रशासनाकडून इम्रान यांच्या प्रकृतीसंदर्भात सविस्तर वैद्यकीय अहवाल मागवला. मात्र केवळ समरी सादर केल्यावरून न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. सादर करण्यात आलेल्या समरी अहवालात इम्रान यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. इम्रान यांच्यावर उपचारांसाठी वैद्यकीय समिती स्थापन होणार असून त्यात त्यांची बहीण डॉ. उझमा खान आणि त्यांच्या खासगी डॉक्टरांचादेखील समावेश करण्यात येणार आहे.