रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार, भाडेवाढीबाबत परिवहन प्राधिकरणाची उद्या बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगर क्षेत्रातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या संघटनांनी भाडेवाढ मंजूर करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन आयुक्त कार्यालयाने मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे (एमएमआरटीए) पाठवला आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी प्राधिकरणाची बैठक होणार असून बैठकीत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

इंधन दरवाढीमुळे जुन्या दरात रिक्षा आणि टॅक्सीची सेवा देताना आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचे रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी निदर्शनास आणले. संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने गुरुवारी दुपारी भाडेवाढीबाबत बैठक निश्चित केली आहे.

बैठकीत भाडेवाढीचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याने मुंबई शहरासह संपूर्ण महानगर क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे.

अपेक्षित भाडेवाढ

भाडे दरवाढ गणनेनुसार रिक्षाच्या किमान भाडय़ात 1 रुपयाची वाढ होऊ शकते, तर टॅक्सीच्या भाडय़ात शहरभर 2 ते 3 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिक्षाचे किमान भाडे 26 रुपयांवरून 27 रुपये होऊ शकते, तर टॅक्सीचे किमान भाडे 31 रुपयांवरून 33 रुपयांपर्यंत वाढू शकते.

  • ऑटोरिक्षा चालक-मालकांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. भाडेवाढीअभावी आमच्या सदस्यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आम्ही भाडेवाढीचा निर्णय घेण्याची विनंती केली आहे, असे मुंबई रिक्षामेन्स युनियनचे सरचिटणीस तंबी पुरियन यांनी सांगितले.