
राज्यातील होमियोपॅथी म्हणजेच बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये (एमएमसी) नोंदणी बंद करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. एमएमसीमध्ये नोंदणी केली जावी यासाठी होमियॉपॅथी डॉक्टरांनी मोठे आंदोलन केले होते. मात्र इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मार्ड या अॅलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांनी त्याला विरोध केला आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.
3 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्यात यावी, अशी बीएचएमएस डॉक्टरांची आग्रही मागणी आहे. बीएचएमएस डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याची मुभा देण्यात आली तेव्हापासूनच अॅलोपॅथी डॉक्टरांकडून सातत्याने विरोध होत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्याच दोन संघटनांमध्ये वाद पेटल्याने आणि तो थेट उच्च न्यायालयात गेल्याने राज्य शासनालाही काय निर्णय घ्यावा असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे मध्यममार्ग म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाने बीएचएमएस डॉक्टरांची नोंदणीच बंद केली आहे. तसे अधिकृत पत्रकच जारी करण्यात आले आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत अशी नोंदणी संयुक्तिक राहणार नाही असे त्यात नमूद करण्यात आले आहे.





























































