
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मातृलिंग, श्रीगणेश, महाकाली, महासरस्वती यांची गेली सहा महिने बंद असलेली पूजाअर्चा नियमित सुरू करावी, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेकडून करण्यात आली आहे. याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी, संवर्धन चौकशी समितीचे प्रमुख आणि धर्मशास्त्र्ा मार्गदर्शक यांना निवेदन देण्यात आले आहे.
श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर हे ‘त्रिकूट प्रासाद’ म्हणून ओळखले जाते. या मंदिरात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीन मुख्य देवतांसह सन्मुख गणेश व मातृलिंग असे देवता पंचायतन आहे. कोणतेही धार्मिक विधी या पाच देवतांशी संबंधित असतात. तसेच देवीची नित्य आरतीसुद्धा या पाचही देवतांकडे परंपरेनुसार नेली जाते. सध्या संवर्धन प्रक्रियेमुळे महाकाली, महासरस्वती व मातृलिंग यांची प्राणतत्त्वे उतरून कलशात स्थापित केली आहेत. श्रावण महिन्यात सर्व धार्मिक विधी धर्म शास्त्र्ााप्रमाणे पार पडत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे.
या ठिकाणी प्रत्यक्षात कोणतेही कामकाज, अडथळा नाही. बांधकाम साहित्यही नाही. त्यामुळे नित्य पूजा-अर्चा सुरू ठेवण्यास कोणतीही अडचण नाही. या ठिकाणी पूजा-अर्चा बंद करण्याबाबत कोणीही आदेश दिलेले नाहीत. तसेच या ठिकाणी पूजाअर्चा का व किती दिवस बंद ठेवणार, हे देवस्थान व्यवस्थापन समितीने जाहीर केलेले नाही. शासनाने नियुक्त केलेल्या धर्मशास्त्र्ा मार्गदर्शकांनी याबाबत कोणताही खुलासा वा आदेश दिलेला नाही. त्यामुळे या ठिकाणची नित्य पूजा कोणाच्या आदेशाने बंद करण्यात आली, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
श्रावण महिना सुरू असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व पुरातत्व विभाग यांनी लोकांच्या भावनेचा विचार करून संवर्धन करता करता मंदिराचे पावित्र्य व श्रद्धा याचा विचार करून या देवतांची पूजा-अर्चा परंपरेनुसार नियमितपणे सुरू करण्यात यावी, अशी मागणी दिलीप अशोक देसाई यांनी केली आहे.



























































