
पोलीस दल म्हटले की डोळ्यांसमोर येते ती कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारांचा शोध आणि कठोर कारवाई! मात्र, या कठोर वर्दीमागे एक हळवे, संवेदनशील आणि माणुसकीने ओथंबलेले मनही असते, याचा प्रत्यय श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या जीवनप्रवासातून आला. स्वतःची पोटची मुलगी अवघ्या २१ दिवसांत गमावण्याचे असह्य दुःख सहन करावे लागले. दुःखातून काहीसे सावरत त्यांनी एका अनाथ मुलीला आपल्या कुटुंबाचा भाग करून घेतले. एवढेच नव्हे, तर आपल्या संपत्तीचा निम्मा हिस्सा तिच्या नावावर करण्याचा निर्णय घेत त्यांनी माणुसकीचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला.
वाघचौरे हे पूर्वी श्रीरामपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) म्हणून कार्यरत होते. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे डीवायएसपी म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कुटुंबावर आघात झाला. त्यांची मुलगी अवनी हिचे दुर्धर आजाराने अवघ्या २१ दिवसांची असताना निधन झाले. पोटच्या मुलीच्या निधनाने वाघचौरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखातून सावरणे कुटुंबासाठी कठीण होते. मात्र, या दुःखातून सावरण्यासाठी वाघचौरे कुटुंबाने अनाथ मुलीला दत्तक घेण्याचे ठरविले. कायदेशीर दत्तक विधान पूर्ण करून त्या मुलीला आपल्या कुटुंबात स्थान दिले आणि तिचे नावही ‘अवनी’ असेच ठेवले.
नशिबाने हिरावून नेलेल्या मुलीची आठवण जपत एका अनाथ मुलीला नवजीवन देण्याचा हा निर्णय केवळ भावनिक नव्हता, तर तो सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला. वाघचौरे यांनी या दत्तक मुलीच्या नावावर आपल्या संपत्तीतील अर्धा हिस्सा करण्याचा निर्णय घेतला आहे.
डावी कडील माहितीपट्टी
स्वतःची पोटची मुलगी गमावण्याचे दुःख सोसलेल्या एका पित्याने दुसऱ्या अनाथ मुलीला ‘मुलगी’ म्हणून स्वीकारले आणि आपल्या दुःखातून सावरून त्या निराधार मुलीच्या आयुष्याला आधार दिला.
सेवेतही दिसते संवेदनशीलता
श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे वर्दीतील संवेदनशील मन सेवेतही दिसून येते. विशेषतः घरातून निघून गेलेल्या अथवा अपहरण झालेल्या मुलींच्या प्रकरणांकडे ते केवळ एक पोलीस केस म्हणून पाहत नाहीत, तर त्या मुलींच्या कुटुंबांची अवस्था आणि त्यांची घालमेल समजून घेतात. त्यामुळे अशा प्रकरणांत मुली सुखरूप परत मिळाव्यात, यासाठी ते विशेष संवेदनशीलतेने प्रयत्न करतात.




























































