कितीही संकटे येऊ द्या, शिवसेना अढळच; भिवंडी, पालघरमध्ये ‘भगवा महाराष्ट्र.. माझा महाराष्ट्र’ मोहिमेला उदंड प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वसामान्य शिवसैनिकांची नाळ येथील मातीशी जोडली गेली आहे. शिवसैनिक हा शिवसेनेचा खरा आधार असून कितीही वादळे आणि संकटे येऊ द्या, शिवसेना अढळच असल्याची ग्वाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी दिली. आतापर्यंत अनेक पक्ष आले आणि गेले, पण संकटांशी मुकाबला करून टिकली ती फक्त शिवसेनाच, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसैनिकांनी लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी, प्रश्न समजावून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

‘भगवा महाराष्ट्र.. माझा महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत भिवंडीच्या मध्यवर्ती शाखेत पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना सुभाष देसाई यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आपल्या संकटकाळात फक्त शिवसैनिक मदतीसाठी धावून येतो, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण करणे आवश्यक असून अन्य पक्ष स्वार्थासाठी काम करतात, पण शिवसैनिक मात्र निःस्वार्थीपण समाजाच्या हितासाठी झटत असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. उपनेते विजय कदम, ज्योती ठाकरे, विश्वास थळे यांनीही आपले विचार मांडले.

भिवंडी ग्रामीण जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, अॅड. अल्पेश भोईर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख मनोज गगे, हनुमान पाटील, प्रवीण पाटील, रश्मी निमसे, कविता भगत, वैशाली मेस्त्री, तालुकाप्रमुख करसन ठाकरे, बाळा धानके, प्रदीप बोडके, गजेंद्र गुळवी, संतोष विशे, बाळा परब, नीलेश पाटील, प्रसाद पाटील, पंकज घरत आदी यावेळी उपस्थित होते.

या मोहिमेला वसईत उदंड प्रतिसाद मिळाला. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच शिवसैनिकांशी थेट चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधला. पक्ष संघटना मजबूत करणे, निवडणुकांची आखणी, विविध सामाजिक उपक्रम, आंदोलन याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. पालघर जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

वसई पूर्वेतील हॉटेल आदित्य येथे झालेल्या या संवाद दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक वाटचाल, शिवसैनिकांशी प्रभावी संवाद तसेच जनतेपर्यंत उपक्रम पोहोचवणे अशा अनेक स्तरांवर या दौऱ्यात चर्चा करण्यात आली. सुभाष देसाई यांच्यासह उपनेते विजय कदम, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख विलास पोतनीस यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात मनसेचे विश्राम मोंडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत, गिरीश राऊत, अनुप पाटील, ओमकार पाटील, सहसंपर्कप्रमुख विकास मोरे, लोकसभा निरीक्षक अजय ठाकूर, माजी जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, वसई विधानसभा संपर्कप्रमुख सुनील सोनकर, महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, भाविका पाटील, भावना किणी, भारती गावडे, रुचिता विश्वासराव, शहरप्रमुख रोहन चव्हाण, संजय कालेकर आदी उपस्थित होते.