
गेल्या आठवड्यात पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे डहाणू तालुक्यातील निकणे, घाटलपाडा येथील रस्ताच वाहून गेला होता. गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने नाकाबंदी झालेल्या ग्रामस्थांनी रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाला केली. मात्र कोणतीच उपाययोजना न झाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुढाकार घेत गावकऱ्यांच्या सहभागाने निकणे, घाटलपाडा रस्त्याची दुरुस्ती केली.
पालघर जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ३९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरी ६९ टक्के पावसाचा टप्पा पार केला असून सततच्या तुफान पावसामुळे यंदा जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रस्तेच वाहून गेले होते. डहाणू तालुक्यातील निकणे, घाटलपाडा येथील रस्ता आणि मोरीदेखील अशाच प्रकारे वाहून गेलीं होती. गावात ये-जा करणारा रस्ताच ‘गायब’ झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली होती. हा रस्ता अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा असल्याने रस्ता व मोरीची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाला केली. मात्र सुस्त प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही.
लोकसहभागातून दुरुस्तीचे काम हाती
गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यानंतर विश्वजीत घोडा, आशिष घोडा व प्रवीण करमोड यांच्या सहकार्याने तसेच निकणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि ग्रामस्थांच्या सहभागातून रस्ता व मोरीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे सध्या रस्ता सुरळीत झाला असून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.



























































