बंगाल बार कौन्सिलच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे जोरदार पुनरागमन; 23 पैकी 15 जागा जिंकत मिळवले वर्चस्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, तृणमूल काँग्रेसने आता एका निवडणुकीत जबरदस्त पुनरागमन केले आहे. तृणमूल काँग्रेसने आता बार कौन्सिलच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला असून ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला या विजयामुळे मोठे बळ मिळाले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसने बंगाल बार कौन्सिल निवडणुकीत जोरदार पुनरागमन केले आहे. २३ पैकी १५ जागा जिंकून त्यांनी वर्चस्व मिळवले आहे. भाजपला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे टीएमसीमध्ये उत्साह संचारला आहे.

पश्चिम बंगाल बार कौन्सिल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने (TMC) २३ पैकी १५ जागा जिंकून आपली पकड कायम ठेवली आहे. भाजपने तीन, डाव्या आघाडीने तीन आणि काँग्रेसने दोन जागा जिंकल्या. तृणमूल काँग्रेसच्या वकील उमेदवारांनी महिलांसाठी राखीव असलेल्या पाचपैकी चार जागा जिंकल्या.

पश्चिम बंगाल बार कौन्सिलच्या २३ निर्वाचित जागांपैकी १८ जागा पुरुषांसाठी आणि पाच महिलांसाठी राखीव होत्या. निकालांनुसार, TMC ने १५, भाजपने तीन, डाव्या आघाडीने तीन आणि काँग्रेसने दोन जागा जिंकल्या. महिलांच्या पाच जागांपैकी TMC ने चार आणि काँग्रेसने एक जागा जिंकली. निवडणुकांनंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, बार कौन्सिल ऑफ इंडिया आणखी दोन महिला उमेदवारांना नामनिर्देशित करेल, ज्यामुळे एकूण सदस्यसंख्या २५ होईल.

या निवडणुकीत एकूण ७५ उमेदवारांनी निवडणूक लढवली. टीएमसीने २३, भाजपने २२, डाव्या आघाडीने १२ आणि १८ अपक्ष वकील उभे केले होते. टीएमसी लॉयर्स सेलचे सुभाशीष चक्रवर्ती सर्वात मोठ्या फरकाने विजयी झाले. इतर प्रमुख विजेत्यांमध्ये बस्सोनेर चॅटर्जी, अन्सार मंडल, अशोक देब, इंद्रनील बसू आणि सिद्धार्थ मुखर्जी यांचा समावेश आहे.