
देशातील वातावरण बदलले आहे, जनता आता भाजप मोदी-शहा सरकारला प्रश्न विचारत आहे आणि सरकार पूर्णपणे घाबरले आहे. भाजप सरकारकडे सांगण्यासारखे काहीच नाही. म्हणून ‘वंदे मातरम्’वरून पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्याचे षड्यंत्र भाजपकडून रचले जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष आ. साजीद खान पठाण यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवन येथे संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘वंदे मातरम्’वरून भाजप राजकारण करत असल्याचे सांगितले.
देशातील हवा बदलली असली तरी बदला घेण्याची संस्कृती काँग्रेसची नाही तर ‘मोहब्बत की दुकान’ हाच आपला मार्ग आहे, तो सोडू नका, असे आवाहन त्यांनी केले. वंदे मातरम् या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा हा काँग्रेसने दिला. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्या प्रमुख नेतृत्वात ‘वंदे मातरम्’ची किती कडवी गायची हा निर्णय घेतला गेला.
काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात ते गायिले जाते. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भागही घेतला नाही त्या भाजपने काँग्रेसला राष्ट्रभक्ती शिकवण्याची गरज नाही. समाजात वाद निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजणे हा भाजपचा डाव असून त्यासाठीच ‘वंदे मातरम्’चा वाद उकरून काढला जात असल्याचे सपकाळ म्हणाले.


























































