
मुंबईतील रस्ते, महामार्ग तसेच दक्षिण मुंबईतील वारसास्थळांच्या परिसरात कचरा आणि ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्यांविरोधात तत्काळ कार्यवाही करा. या आदेशाचे काटेकोर पालन करताना आवश्यक ती सर्व काळजी आणि दक्षता घ्या, कारवाईत कोणतीही कसूर नको, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज मुंबई महापालिकेला दिले.
कांजूरमार्ग येथील कचरा भरावभूमीशी संबंधित जनहित याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती निला गोखले यांच्या खंडपीठासमोर आज बुधवारी सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी ए वॉर्डचे अतिरिक्त आयुक्त उज्ज्वल इंगोले यांनी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले.
मुंबई विद्यापीठ, मुंबई उच्च न्यायालय, सिटी सिव्हिल कोर्ट आणि ओव्हल मैदान यांसारख्या दक्षिण मुंबईतील वारसास्थळांच्या जवळ कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ तसेच पार्किंग प्रतिबंधित करण्यात येईल अशी हमी त्यांनी खंडपीठाला दिली, तर कचरा डम्पिंग ग्राऊंडच्या परिसरातील दुर्गंधीबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा दावा कंत्राटदाराने केला. यापूर्वी सुमारे ५०० तक्रारी येत होत्या, त्या आता २४ वर आल्या असून त्या शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे कंत्राटदाराने खंडपीठाला सांगितले.






























































