टाटा रुग्णालयात कर्करोग रुग्णांना मिळणार मोफत विग, चेरियन फाऊंडेशनचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्करोगाच्या उपचारादरम्यान केमोथेरपीमुळे केस गळाल्याने रुग्णांच्या आत्मविश्वासावर आणि भावनिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन आर्थिकदृष्टय़ा दुर्बल रुग्णांना उच्च दर्जाचे नैसर्गिक मानवी केसांचे विग मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. टाटा स्मारक केंद्र आणि द चेरियन फाऊंडेशनच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून टाटा रुग्णालयाला चेरियन फाऊंडेशनकडून सुमारे 1.5 कोटी रुपयांचे उच्च दर्जाचे 500 विग देण्यात येणार आहेत.

नैसर्गिक मानवी केसांपासून हे उच्च दर्जाचे विग तयार करण्याची जबाबदारी राज हेअर इंटरनॅशनलने स्वीकारली आहे. कर्करोगाच्या उपचारांमध्ये रुग्णाचे आयुष्य वाढवण्यासोबतच त्यांचे जीवनमान आणि सन्मान टिकवून ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश यांनी सांगितले. तसेच विगचा खर्च परवडणारा नसल्याने सर्वसामान्यांपर्यंत ही सेवा पुरवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्तन कर्करोग विभागाच्या प्राध्यापिका डॉ. शलाका जोशी यांनी सांगितले.