कायदा-सुव्यवस्थेसाठी लाठीगोळ्यांची गरज नसते! प्रभाकर पवार लिखित ‘मुंबई पोलीस आयुक्तांचा इतिहास’ पुस्तकाचे प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केवळ लाठीगोळ्या चालवण्याची गरज नसते. जनतेशी संवाद साधून तसेच ‘बॅकडोअर’ व्यवस्थापन करूनही परिस्थिती हाताळता येते, असे परखड मत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर पोलिसांच्या झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार लिखित ‘मुंबई पोलीस आयुक्तांचा इतिहास’ या पुस्तकाचा शानदार प्रकाशन सोहळा मुंबई पोलीस क्लब येथील प्रेरणा सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्यांमधील सरकारच्या हस्तक्षेपावरही सिंग यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी प्रभाकर पवार यांच्या पुस्तकाचे कौतुक केले. “मुंबई पोलिसांची कामगिरी ही कोणत्याही एका पोलीस आयुक्ताची किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याची नसून संपूर्ण पोलीस दलाच्या सांघिक प्रयत्नांचे फलित आहे,” असे प्रतिपादन देवेन भारती यांनी केले.

हा पोलीस आयुक्तांचा ‘गोपनीय अहवाल’

“प्रभाकर पवार यांनी पोलीस दल आणि गुन्हेगारी विश्वावर आतापर्यंत तब्बल ११ पुस्तके लिहिली आहेत, ही गौरवाची बाब आहे. त्यांचे नवीन पुस्तक मी उत्सुकतेपोटी वाचले. हे पुस्तक म्हणजे पोलीस आयुक्तांचा वार्षिक गोपनीय अहवाल (ACR) आहे,” असे प्रशंसोद्गार एम. एन. सिंग यांनी काढले. यावेळी प्रभाकर पवार यांनी पुस्तक निर्मितीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय व्हनमाने यांनी केले.

क्रांती घडवण्याची ताकद छापील अक्षरांतच-संजय राऊत

मुंबईने अनेक प्रकारची गुन्हेगारी पाहिली आहे, ती गुन्हेगारी इतक्याच ताकदीने मोडीत काढणारे पोलीस आयुक्तही मुंबईने पाहिले. पोलीस शहरासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी बलिदान देतात म्हणूनच जनता सुरक्षित असते. पोलिसांच्या या योगदानाची कदर राजकारण्यांनी ठेवणे आवश्यक असते. पोलिसांचे खच्चीकरण केले तर राज्य टिकणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस दलाबाबत कौतुकोद्गार काढले. देशात क्रांती घडवण्याची खरी ताकद छापील अक्षरांतच आहे, असेही प्रतिपादन संजय राऊत यांनी केले.