रामदास झोळ याचा अटकपूर्व जामीन फेटाळला, माया झोळसह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोंदू मनोहर भोसले याच्याशी आर्थिक हितसंबंध असलेल्या आरोपी माया झोळ यांच्यासह राजेंद्र हुंबे आणि लक्ष्मीकांत लिगाडे या तिघांचीही १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, ‘दत्त कला शिक्षण संस्थे’चा संस्थापक-अध्यक्ष रामदास झोळ याचा अटकपूर्व जामीन आज बार्शी न्यायालयाने फेटाळला.

दत्त कला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ आणि त्याची पत्नी सचिव माया झोळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात माया झोळ हिला पोलिसांनी अटक केली असून, रामदास झोळ फरार आहे. दत्त कला शिक्षण संस्थेबाबत धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग आणि आयकर विभाग या तीनही यंत्रणांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. तसेच झोळ याच्या अटकेसाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली असून, विशेष पथकाचीही नियुक्ती केली आहे. दरम्यान, रामदास झोळ याचा अटकपूर्व जामीन आज बार्शी न्यायालयाने फेटाळला आहे.

मनोहर भोसले आणि दत्त कला शिक्षण संस्थेचे आर्थिक हितसंबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. भोंदू मनोहर भोसले याच्याकडून मिळालेल्या पैशांची विल्हेवाट दत्त कला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लावल्याचे आणि तपासादरम्यान संस्थेच्या कामकाजात अनियमितता आढळल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.

भोंदू मनोहर भोसले हा अनिष्ट प्रथा, महिलांवरील अत्याचार, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी सध्या तुरुंगात आहे. तपासादरम्यान दत्त कला शिक्षण संस्थेचा संस्थापक-अध्यक्ष प्रा. रामदास झोळ याचा मनोहर भोसले याच्या अवैध पैशांची विल्हेवाट लावण्यात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात मदत केल्याच्या आरोपावरून संस्थेतील राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे यांना अटक करण्यात आली होती. तसेच रामदास झोळ याची पत्नी माया झोळ हिलाची १६ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. माढा न्यायालायाने प्रारंभी तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी (२१ रोजी) तिघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने माया झोळ हिच्यासह राजेंद्र हुंबे आणि लक्ष्मीकांत लिगाडे यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.