
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने भोर तालुक्यातील किकवी येथील अनंत दूध प्रा. लि. या संघाकडून खरेदी केलेल्या जमीन व प्लांट व्यवहारात ५० कोटींहून अधिक अपहार झाल्याचे प्रकरण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी चव्हाट्यावर आणले आहे. या व्यवहारात संचालक आणि कार्यकारी संचालकांनी संगनमताने अपहार केल्याचा आरोप करत, या व्यवहाराची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करावी, अशी मागणी ‘गोकुळ’चे प्रशासक प्रदीप मालगावे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख विराज पाटील यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. किकवी (ता. भोर, जि. पुणे) येथील एकूण २२४ एकर शेतजमीन गोकुळ दूध संघाने प्रतिगुंठा १५ लाख ५३ हजार ९४५ रुपयांप्रमाणे ३४ कोटी ८० लाख ८३ हजार ९०९ इतक्या मोठ्या रकमेला खरेदी केली आहे. वास्तविक खरेदी कालावधीत येथील प्रचलित दर हा शेतजमिनीसाठी साडेतीन ते चार लाखांपर्यंत आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघ व्यवस्थापनाने प्रतिगुंठा ११ लाख रुपये पेक्षा जादा दराने ही जमीन खरेदी केल्याचे दिसून येते.
शिवाय ११० एकर क्षेत्र व त्यावरील गेले चार-पाच वर्षे बंद असलेला अनंत दूध प्रा. लि. यांचा दूध प्रक्रिया प्लांट ‘गोकुळ’ने तब्बल ४७ कोटी २५ लाख १६ हजार १०० रुपये एवढ्या मोठ्या रकमेला खरेदी केला. त्याचाही दर प्रतिगुंठा १५ लाख असे धरल्यास एकूण ११० एकर क्षेत्राची किंमत सुमारे १६ कोटी ५० लाख रुपये आणि खराब झालेला दूध प्रक्रिया प्लांट संघाने ३० कोटी ७५ लाख १६ हजार १०० एवढ्या मोठ्या रकमेला खरेदी केल्याचे दिसून येते. संघाने एकूण ३३४ एकर क्षेत्र आणि त्यावरील खराब मशिनरीसह बंद पडलेला दुधाचा प्लांट एकूण ८२ कोटी ६ लाखाला खरेदी केला. यामध्ये सुमारे ५० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा अपहार दिसून येत आहे.
व्यवहारातील पृथ्वीराज पाटील कोण, त्यांचा अधिकार काय ?
प्रतिगुंठा १० लाख व त्याहीपेक्षा अधिक रुपयांचा अपहार संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांनी संगनमताने केल्याचा आरोप करत, गोकुळ दूध संघातर्फे पृथ्वीराज दत्तात्रय पाटील यांनी सर्व व्यवहारांत हस्तक्षेप केल्याचे दिसून येत आहे. पृथ्वीराज पाटील यांना हा अधिकार कोणी दिला, असा सवाल करत, गोकुळ दूध संघाने घेतलेल्या संचालक मंडळ ठरावात असा कोणताही अधिकार व पत्र देण्यात आलेले नसतानाही पृथ्वीराज पाटील यांनी कोणत्या अधिकाराने या व्यवहारात हस्तक्षेप केला, याची चौकशीची मागणीही शिवसेनेकडून करण्यात आली.
अनुषंगिक खर्च सोळा टक्क्यांपेक्षा जास्त
हा प्लांट खरेदी करताना संघाकडून १३ कोटी अनुषंगिक खर्च होणार असल्याने अशा खर्चाला ठराव क्रमांक १४ने मंजुरी दिलेली आहे. हा अनुषंगिक खर्च एकूण व्यवहाराच्या सोळा टक्क्यांपेक्षा जास्त ठरविण्यात आला आहे. म्हणजेच ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी अवस्था आहे. गोकुळ दूध संघाला सर्व स्टॅम्प ड्युटी माफ झालेली असताना १३ कोटी एवढा अवाढव्य खर्च खरेदीसाठी कसा काय मंजूर केला, याबाबत सखोल तपासणीची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
मूल्य निर्धारक प्रताप साळुंखेही जबाबदार
शासकीय नोंदणीकृत मूल्य निर्धारक प्रताप बी. साळुंखे यांनी या मालमत्तेचे मूल्यांकन ८६ कोटी ५३ लाख ९२ हजार ७२० एवढे केले आहे. या व्यवहारात घडलेल्या अपहारास शासकीय नोंदणीकृत मूल्य निर्धारक प्रताप साळुंखे हेही तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांचा परवाना जप्त करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा. शिवाय अनंत दूध प्रा. लि. यांचे ताळेबंद तसेच संबंधित प्लांट आणि जागेची किंमत घसारा वजा जाता काय होती, याबाबतची तपासणी आणि किमतीपेक्षा त्यांना किती पटीने जास्त मोबदला मिळाला याचा तपास करणे आवश्यक असल्याचेही शिवसेनेने निवेदनात म्हटले आहे.




























































