
देशभरातील सरकारी कंपन्या विकून टाकणे किंवा त्यांचे खासगीकरण करणाऱया केंद्रातील मोदी सरकारने आता देशातील 11 विमानतळांचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर विमानतळाचाही समावेश आहे.
हे विमानतळ 5 गटांमध्ये विभागले जाणार असून नागरी हवाई वाहतूक मंत्राल्याने 11 विमानतळांसाठी खासगी भागीदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार प्रत्येक गट एकाच कंत्राटदाराला दिला जाईल. यात 5 मोठय़ा विमानतळांसोबत 6 लहान विमानतळ जोडले जातील. सार्वजनिक खासगी भागीदारी मूल्यांकन समितीने (पीपीपीएसी) 4 ऑगस्टला झालेल्या बैठकीत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिली. त्यानुसार सहा लहान विमानतळ पाच मोठय़ा विमानतळांच्या गटात विभागले जाणार आहेत. अमृतसर आणि कांगडा-गग्गल विमानतळ हे वाराणसीबरोबर एका गटात असेल. याच धर्तीवर गया आणि कुशीनगर, भुवनेश्वर आणि हुबळी, रायपूर आणि औरंगाबाद ही विमानतळ एकेका गटात असतील. तिरुचरापल्ली आणि तिरुपती विमानतळ स्वतंत्र गटात असतील, असे ‘पीपीपीएसी’च्या बैठकीच्या कार्यवृत्तात नमूद करण्यात आले आहे. विमानतळ चालवण्यासाठी खासगी कंपन्या 8,622 कोटींची गुंतवणूक करण्याचा अंदाज आहे. दस्तऐवजानुसार, बाजापेठेतील मत्तेदारीचा धोका कमी करण्यासाठी एका बोली लावणाऱयाला किती विमानतळ द्यायचे यावर कमाल मर्यादा असेल.
खासगीकरणाच्या अटी
खासगीकरण प्रक्रियेनंतर विमानतळ प्राधिकरण कर्मचाऱयांसाठी एक वर्षाचा संयुक्त व्यवस्थापन कार्यकाळ देण्याचा प्रस्ताव आहे. दस्तऐवजांनुसार, कंत्राटदाराला तीन वर्षांपर्यंत प्राधिकरणाच्या 60 टक्के कर्मचाऱयांना सेवेत कायम ठेवावे लागेल. यापूर्वीच्या टप्प्यात एक वर्षाचा संयुक्त व्यवस्थापन कार्यकाळ व दोन वर्षांचा प्रतिनियुक्ती कार्यकाळ दिला होता.
कोणकोणत्या विमातळांचा समावेश
छत्रपती संभाजीनगर
अमृतसर
कांगडा-गग्गल
गया
कुशीनगर
भुवनेश्वर
हुबळी
रायपूर
तिरुचरापल्ली
तिरुपती वाराणासी



























































