
राज्याची उपराजधानी नागपुरात सध्या संघटित गुन्हेगारी आणि टोळीयुद्धाच्या ज्वालामुखीवर उभे असल्यासारखी परिस्थिती आहे. दर दोन दिवसांनी घडणाऱया हत्याकांडाच्या मालिकेमुळे शहरात मोकाट गुंडांनी कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिले आहे.
शहरात दर दोन दिवसांनी एक खून घडत आहे. त्यात प्राणघातक हल्ल्यांच्या रोज किमान तीन घटना पोलीस डायरीवर नोंद होतात. त्यामुळे चालू वर्षातील एकूण खुनांचा आकडा 65 च्या पार गेला आहे, तर प्राणघातक हल्ल्यांची संख्या तब्बल 250 च्या पुढे सरकली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गुन्हे शाखेचा क्लास घेत शहरातील छोटय़ा-मोठय़ा सक्रिय गुंड टोळ्यांची, त्यांच्या म्होरक्यांची आणि त्यांना मिळणाऱया आर्थिक व राजकीय पाठिंब्याची माहिती तत्काळ सादर करण्याचे फर्मान बजावले आहे.






























































