कोयना धरणातील पाणीसाठा 100 टीएमसी पार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोयना धरणातील पाणीसाठय़ात सातत्याने वाढ होत असून, मंगळवारी (दि. 25) सायंकाळी 5 वाजता धरणातील एकूण पाणीसाठा 100.81 टीएमसीवर पोहोचला. धरण 95.78 टक्के भरले असून, उपयुक्त पाणीसाठा 95.69 टीएमसी (95.57 टक्के) झाला आहे. धरणातील पाणीसाठय़ाने 100 टीएमसीचा टप्पा ओलांडल्याने कृष्णा खोऱयातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

धरणाची पाणीपातळी 2160 फूट 1 इंच (658.393 मीटर) नोंदविण्यात आली. धरणात सध्या 3343 क्युसेक पाण्याची आवक होत असून, दिवसभरात सुमारे 0.10 टीएमसी पाण्याची आवक झाली. धरणातून वीजनिर्मिती केंद्र तसेच विमोचक दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही.

साताऱ्यात पाण्याचा प्रश्न मिटला

सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम, धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी धरणातील पाणीपातळी 95 टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर धरणातील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी काही धरणातून विसर्ग सुरू आहे. नद्यांच्या पाणीपातळीत अद्यापही वाढ आहे. जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व जावली तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.