खर्डीचा पाणीपुरवठा सुरू; ट्रान्सफॉर्मर पुन्हा बसवला, चोरट्यांचा शोध सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांदा गावातील पाणीपुरवठा योजनेचा ट्रान्सफॉर्मरच चोरट्यांनी लांबवल्याने खर्डीवासीयांचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. याबाबतचे वृत्त दै. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन त्याच जागेवर पुन्हा नवा ट्रान्सफॉर्मर बसवला. त्यामुळे पाणीपुरवठा पूर्ववत झाला असून ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान ट्रान्सफॉर्मर चोरणाऱ्यांचा अजून थांगपत्ता लागला नसून पोलीस शोध घेत आहेत.

खर्डी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चोरांचा सुळसुळाट झाला असून आता तर त्यांची महावितरणचा ट्रान्सफॉर्मर चोरण्यापर्यंत मजल गेली आहे. खर्डी पाणीपुरवठा योजनेचा रोहित्र चोरीला गेल्यानंतर उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व महावितरणचे सहायक अभियंता सुरेश पवार यांनी शहापूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तसेच ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून चांदा गावात पुन्हा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा निर्णय घेतला.

रोहित्र बसवण्याची जागा ही अत्यंत किचकट तसेच चिखलमय होती. तेथे जाण्यासाठी रस्ताही व्यवस्थित नाही. त्यामुळे नवीन रोहित्र जागेवर घेऊन जाणे हे मोठे आव्हान होते. अखेर ट्रक, टेम्पो आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांचा वापर करून मोठ्या प्रयत्नाने चांदा गावात ट्रान्सफार्मर पूर्वीच्याच ठिकाणी आणला. महावितरण, ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीव मुठीत धरून अत्यंत कठीण परिस्थितीत ओढत ढकलत पूर्वीच्या जागी ट्रान्सफॉर्मर फिट केला. त्यानंतर लगेच खर्डी गावचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे..