पालघर जिल्हा परिषदेत ऐकावं ते नवलच, एका शौचालयाच्या दुरुस्तीसाठी तब्बल ८ लाख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघर जिल्हा परिषदेत ऐकावं ते नवलच असा प्रकार समोर आला आहे. सरकारी अनुदानाचे नव्याने शौचालय बांधण्याचा खर्च साधारण १२ हजार असताना मोखाडा तालुक्यातील एका शौचालयाच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी ८ लाख खर्च केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली अंदाजपत्रकात फुगवटा केल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख नचिकेत पाटील यांनी केला असून या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

२०२४-२५ हा आराखडा तयार करताना तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता राजेश पाध्ये व बांधकाम कार्यकारी अभियंता जागृती संखे यांनी सह्या केल्या आहेत. त्यामुळे कामाच्या अवास्तव रकमेकडे दुर्लक्ष करून या सर्वांनी या आराखड्याला मान्यता दिली. दरम्यान आराखड्यातील या कामांची चौकशी केली जाईल, अशी माहिती पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिली.