आणखी एका कंत्राटदाराची आत्महत्या, महायुती सरकारने दोन कोटींचे बिल थकवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कंत्राटदारांची हजारो कोटींची बिले महायुती सरकारने थकवली आहेत. त्यामुळे कंत्राटदारांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवली आहे. मुंबईतील 2 कोटी रुपयांची कामे करूनही सरकारकडून पैसे न मिळाल्याने निराश झालेले नवी मुंबईतील 45 वर्षीय कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या केल्याची घटना आज घडली. बिले थकल्यामुळे आत्महत्या करणारे देवकाते हे राज्यातले सातवे कंत्राटदार आहेत.

मूळचे नांदेड जिह्यातील मुखेड येथील असणारे गजानन देवकाते नवी मुंबईत राहत होते. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची मुंबईतील सुमारे 2 कोटी रुपयांची कामे केली होती. कामे पूर्ण होऊनही पैसे न मिळाल्याने त्यांना प्रशासकीय कार्यालयांचे खेटे मारावे लागत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून त्यांनी आपल्या अडचणी मांडल्या होत्या. माझे कुटुंब आणि त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे याच व्यवसायावर अवलंबून आहे. कामे पूर्ण करूनही बिले मिळवण्यासाठी पालिकेच्या दहा-दहा वेळा चकरा माराव्या लागत आहेत. काम करूनही पैसे मिळत नसतील तर आम्ही जगायचे कसे, असा सवाल त्यांनी या पत्रातून उपस्थित केला होता. तरीही निर्दयी प्रशासनाने त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही. अखेर सततच्या मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

कंत्राटदार संघटनांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

गजानन देवकाते यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरातील कंत्राटदार संघटना आक्रमक झाल्या आहेत. हक्काचे पैसे मागणाऱ्या देवकाते यांना सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांनी सातत्याने अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचा मानसिक छळ केला असा आरोप करत, देवकाते यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर आठ दिवसांत कठोर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले, मंगेश आवळे, राज्य अभियंता संघटनेचे महासचिव राजेश देशमुख, मुंबई कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष दादासाहेब इंगळे, सुरेश कडू पाटील, प्रकाश पालरेचा, अनिल पाटील, प्रकाश पांडव, प्रशांत कारंडे यांनी शासनास दिला आहे. या संघटनांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. थकीत बिलांप्रश्नी गेल्या आठ-दहा महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा विनंती करूनही भेट मिळालेली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

आतापर्यंत सात कंत्राटदारांनी जीवन संपवले

शासनाकडून जलजीवन मिशनच्या कामाचे 1 कोटी 40 लाख रुपये न मिळाल्यामुळे सांगली जिह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जुलै 2025 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सरकारी कामांचे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी झाल्याने कंत्राटदार विनोद राठोड आणि अनुपम शर्मा यांनाही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. आज गजानन देवकाते यांनी आत्महत्या केली. राज्यात आतापर्यंत कंत्राटदारांच्या आत्महत्येच्या सात घटना घडल्या आहेत.