
मुंबई महानगरातील वाहतूक काsंडी सोडविण्यासाठी व अखंड प्रवासाच्या उद्देशाने मुंबई महापालिकेने मुंबई कोस्टल रोड (उत्तर) हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. संपूर्ण मुंबईचा किनारपट्टा यामुळे एकमेकांना जोडला जाणार आहे. हा मेगा प्रकल्प आंतरबदल व जोडरस्त्यासह सुमारे 60 किलोमीटरचा असून वेसावे-भाईंदर हे भाग कोस्टल रोडने जोडले जाणार आहेत. त्यामुळे वेसावे ते भाईंदर प्रवासाचा कालावधी 90 ते 120 मिनिटांवरून केवळ 15 ते 20 मिनिटांवर येणार आहे. मुंबई कोस्टल रोड (उत्तर) प्रकल्पाच्या उभारणीचे काम ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर भाईंदर जोडरस्ता अशा एकूण सात टप्प्यांमध्ये होणार आहे.
पॅकेज सीमध्ये माईंडस्पेस मालाड ते चारकोप खाडीदरम्यान उत्तर दिशेने जाणाऱया 3.9 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा आणि पॅकेज डी मध्ये चारकोप खाडी ते माईंडस्पेस मालाडदरम्यान दक्षिण दिशेने जाणाऱ्या 3.9 किलोमीटर लांबीच्या जुळय़ा बोगद्यांचा समावेश आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी या दोनही पॅकेजअंतर्गत येणाऱया कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
चारकोप येथे बोगद्याच्या बांधकामासाठी शाफ्ट उभारण्यात येणार असून त्यासाठी 65 मीटर बाय 40 मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर खोदकाम सुरू करण्यात आले असून पायलिंगचे काम सुरू आहे. टीबीएमचे सुटे भाग डिसेंबर 2026 मध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर जुळवाजुळव व प्रत्यक्ष बोगद्याचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. जून महिन्यात दुसऱया टीबीएम यंत्राची जुळवाजुळव पूर्ण करून दुसऱया बोगद्याचे खोदकाम सुरू केले जाईल.

























































