
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचे काम महत्त्वाच्या टप्प्यावर पोचले आहे. ‘तुळशी’ या टनेल बोरिंग मशीनद्वारे (टीबीएम) प्रकल्पाचे नऊ मीटर लांबीचे खोदकाम पूर्ण केले आहे. दुसऱ्या मशीनचे खोदकाम ऑक्टोबरनंतर सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे 90 मिनिटांचा प्रवास 20 मिनिटांत करणे शक्य होणार आहे.
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता टप्पा 3 ब अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली ‘तुळशी’ या टनेल बोरिंग मशीनद्वारे (टीबीएम) 5.30 किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. पहिले बोगदा खणन संयंत्र 17 ऑगस्ट 2026 रोजी कार्यान्वित करण्यात आले आहे. संयंत्राने 9 मीटर लांबीचे खोदकाम पूर्ण केले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी सकाळी प्रकल्प स्थळास भेट देऊन पाहणी केली. कामाचा वेग कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे तसेच कामगारांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
ऑक्टोबरनंतर दुसऱ्या मशीनचे काम सुरू
दुसऱ्या बोगदा खणन संयंत्राचे सुटे भाग जुळवाजुळवीचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत जुळवाजुळवीचे संपूर्ण काम पूर्ण करून 1 ऑक्टोबरपासून आवश्यक चाचणी करून प्रत्यक्ष बोगदा खणन प्रक्रियेचे नियोजन करण्याचे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले.

























































