गौतम ‘गंभीर’ कधी होणार…विजय हिरावल्याचे कारण न देता श्रीलंकेच्या खेळाडूचे कौतुक, पत्रकारांना सामोरे न जाता संघासाठी ट्विटरवरून संदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबवर मैदानावर खेळला गेलेला हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना रोमांचक वळणावर संपला. हिंदुस्थानचा संघ हा सामना जिंकून मालिका 2-0 ने मालिका जिंकेल असे सर्वांना वाटत होते, पण फॉलोऑन देऊनही श्रीलंकेने दुसऱया डावात दमदार कामगिरी करत सामना अनिर्णित राखला. त्यामुळे हिंदुस्थानने दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 ने जिंकता आली. हिंदुस्थानासाठी हा एक प्रकारचा पराभवच होता. त्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे पत्रकारांना सामोरे न जाता त्यांनी एक ट्विट केले आहे.

गंभीर यांनी काय लिहिले

सामन्यानंतर गंभीर यांनी त्यांच्या अधिपृत सोशल मीडिया हँडलवर दोन्ही संघांच्या कामगिरीचे आणि कसोटी क्रिकेटच्या भावनेचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, ‘कसोटी क्रिकेटसाठी चारित्र्य, संयम आणि मानसिक शक्ती आवश्यक असते. जे आमच्या मुलांनी दाखवले, सोनल दिनुशाच्या अपवादात्मक कामगिरीबद्दल विशेष कौतुक.’

बोथट गोलंदाजीबाबत शब्दही नाही

हिंदुस्थानची गोलंदाजी एवढी बोथट झाली होती की, त्यांना पहिल्या सत्रात एकही विकेट काढता आली नाही. एका दिवसात 90 षटके असतात, पण त्यांना या 90 षटकांत चार विकेट्स मिळवता आल्या नाहीत आणि संघाची ही हार होती. पण त्यावर एक चकार शब्दही गंभीर यांनी काढला नाही. उलटपक्षी त्यांनी हिंदुस्थानच्या खेळाडूंच्या संयमाचे कौतुक केले आहे.

दिशाहीन नेतृत्वाला दिशा कोण दाखवणार?

शुभमन गिलचे नेतृत्व हे पाचव्या दिवशी दिशाहीन झालेले सर्वांनीच पाहिले. नेमके कोणते गोलंदाज कधी वापरायचे आणि क्षेत्ररक्षण कसे लावायचे, हे त्याला समजत नव्हते. परिस्थितीनुरूप त्याने कोणताही बदल यावेळी केला नाही. त्यामुळे या दिशाहीन कर्णधाराला दिशा कोण दाखवणार, असा सवाल चाहते उपस्थित करत आहेत. गिलकडे जास्त अनुभव नसला तरी गंभीर यांनी त्याला दिशा दाखवायला हवी होती, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

संघ निवडीची चूक झाकोळली

दुसऱया सामन्यासाठी संघात पुलदीप यादवला वगळले आणि सारांश जैनला संधी दिली. पण गौतम गंभीर आणि शुभमन गिल यांचा हा निर्णय पुरता चुकला. कारण सारांशला या सामन्यात आपल्या निवडीला साजेशी कामगिरीच करता आली नाही. त्याला या संधीचे सोने करता आले नाही. पण त्याला संघात घेण्याचा निर्णय चुकला, ही गोष्ट गंभीर आणि गिल यांनी झाकोळली आहे.

आपल्या खेळाडूंची कानउघाडणी कधी?

गंभीर यांनी आपल्या ट्विटमधून श्रीलंकेच्या सोनल दिनुशाचे जोरदार कौतुक केले आहे. ही खेळभावनेसाठी चांगली गोष्ट आहेच, पण आपल्या ज्या खेळाडूंमुळे विजय हिरावला त्यांची कानउघाडणी केली जाणार की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे म्हटले जात आहे. कारण विजय हिरावल्यानंतरही गंभीर हे हिंदुस्थानी खेळाडूंचे कौतुक का करत आहेत, याचेही उत्तर चाहत्यांना मिळालेले नाही.