आदिवासी विद्यार्थी-मंत्री उईके यांच्यात खडाजंगी, आंदोलनस्थळावरून काढता पाय; राजीनाम्यासाठी जोरदार घोषणाबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना भ्रष्ट कारभारावरून धारेवर धरले. आमच्या जीवाशी खेळू नका, उडवाउडवीची उत्तरे आणि पोकळ आश्वासने देऊ नका, ठोस निर्णय घ्या, अशी ठाम भूमिका घेतली. विविध प्रश्नी थेट पुरावेच समोर ठेवून त्यांना निरूत्तर केले. दोन तासांची ही चर्चा निष्फळ ठरली. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने मंत्री उईके यांना आंदोलनस्थळावरून काढता पाय घ्यावा लागला.

गडचिरोली जिह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या पुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये, तर जखमींना पन्नास लाखांची भरपाई मिळावी, संबंधित दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी; सर्व आश्रमशाळांच्या तपासणीसाठी उच्चस्तरीय समिती नेमावी; सेंट्रल किचन पद्धती रद्द करावी; दोन वर्षातील राज्यातील विषबाधांसह विविध घटनांमधील सुमारे 584 विद्यार्थ्यांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी राज्यभरातील विद्यार्थी नाशिकच्या इदगाह मैदानावर 18 ऑगस्टपासून आंदोलन करीत आहेत. सहा दिवसांपासून येथे लक्ष्मी जाधव, राहुल पावरा, विवेक गावीत यांचे आमरण उपोषण सुरू असून, प्रपृती खालावल्याने लक्ष्मी व राहुल यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काळ्या राख्या बांधल्या

मंत्री अशोक उईके यांनी सादर केलेल्या पृती आराखडय़ातून एकही मागणी पूर्ण होत नसल्याने संबंधित प्रत आंदोलकांनी फाडून टाकली. पूर्ण व्यवस्थाच काळवंडली असल्याने त्याचा निषेध म्हणून आंदोलकांनी भगिनींकडून राखीपौर्णिमेनिमित्त काळ्या राख्या बांधून घेतल्या. मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे बहिणींना वचन दिले. 1 सप्टेंबरला आंदोलन करणारच, असा निर्धार विद्यार्थी प्रतिनिधी प्रशांत गावंढे यांनी व्यक्त केला.