खरगेंच्या सभास्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मोदींनी द्यावेत, राहुल गांधी यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची उत्तराखंडमधील हल्दानी येथे विजय शंखनाद सभा झाली होती. या सभेनंतर हिंदू संघटनांनी सभास्थळाचे शुद्धीकरण केले होते. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेस नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आरोपींवर अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शनिवारी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी ही मागणी करत भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीवरही सडकून टीका केली.

सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शुद्धीकरण विधी करणे हा थेट गुन्हा आहे आणि हे कृत्य अनुसूचित जाती आणि जमाती कायद्याचे स्पष्ट उल्लंघन करते. एवढे घडूनही अद्याप दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. हे अत्यंत संतापजनक आहे, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.

पंतप्रधान मोदी स्वतःला संपूर्ण देशाचे आणि सर्व जातींचे प्रतिनिधित्व करणारे मानतात. मात्र, त्यांच्या पक्षाचे नेते या शुद्धीकरणाचे समर्थन करताना दिसतात, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच उत्तराखंड राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे हे कर्तव्य आहे की त्यांनी या प्रकरणी खरगे यांना न्याय द्यावा. पंतप्रधानांनी स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप करून दोषींवर त्वरित SC/ST कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.

नेमकं प्रकरण काय?

हल्दानी येथे 8 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या विजय शंखनाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, उत्तराखंडच्या काँग्रेस प्रभारी कुमारी सेलजा तसेच विरोधी पक्षनेते यशपाल आर्य यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. सभेनंतर श्री राम सेना चॅरिटेबल सर्व्हिस ट्रस्ट या हिंदू संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांनी सभास्थळाचे शुद्धीकरण केले होते. यावेळी वैदिक मंत्रोच्चारांसह पूजा आणि यज्ञ करण्यात आला होता. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्षांनी याचे समर्थनही केले होते. खरगे हे दलित समाजाचे असल्यानेच केवळ द्वेषभावनेतून हे शुद्धीकरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला होता. याच मुद्द्यावरून आता राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.