सामना अग्रलेख – पुण्यातील ‘डीजे’वाले बाबू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रीय समाजातील अनेक सुधारणावादी, पुरोगामी पुढारी पुण्यातच जन्मले व त्यांनी सामाजिक आंदोलनांना दिशा दिली. टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव ही एक सामाजिक एकोप्याची चळवळच होती. आता या चळवळीचा ‘कर्कश डीजे’ झाला आहे. तरीही चांगली बाब अशी की, पुण्याच्या गणेशोत्सवाची पारंपरिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी पुण्यनगरीतील दोनशेहून जास्त गणेश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे ‘डीजे’मुक्त ठेवून पारंपरिक ढोल-ताशे, बॅन्ड, सांस्कृतिक मराठी कार्यक्रमांना प्राधान्य देऊ असे जाहीर केले. त्यांचे पुढारीपण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ करीत आहे. त्याबद्दल ते कौतुकास पात्र आहे. डीजेवाले बाबूंच्या विरोधात पुणेकरांचा आवाज बुलंद असल्याचे हे लक्षण आहे!

पुण्यातील जनता गणेशोत्सवातील गोंगाटाविरोधात रस्त्यावर उतरली आहे. गणेशोत्सवाची उज्ज्वल परंपरा ‘डीजे’च्या कर्णकर्कश गोंधळात नष्ट होत आहे. ‘डीजे’वरील बंदीसाठी पुणेकरांनी सुरू केलेले आंदोलन महाराष्ट्राच्या इतर भागांतही पसरू शकेल. पुणेकरांनी फक्त सुरुवात केली आहे. जसा मशिदीवरील भोंग्यांचा सगळयांना त्रास होतो आणि भोंग्यांवरील बांग कानठळ्या बसवते तसाच त्रास गणेशोत्सवातील ‘डीजे’च्या दणदणाटाचाही होतो. ‘गणेशोत्सव भक्तीचा की हा असा गोंगाटाचा, ध्वनी प्रदूषणाचा?’ असा प्रश्न पुणेकरांनी विचारला. रविवारी पुण्याच्या डेक्कन परिसरातील गुडलक चौक आणि अभिनव चौकात आंदोलन झाले. त्यात हजारो पुणेकर उत्स्फूर्तपणे जमले. गुडलक चौकाला ‘जंतर मंतर’वरील आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. पुणेकरांच्या कानाचे पडदे ‘डीजे’च्या दणक्याने नादुरुस्त झाले व ही दणादण म्हणजे हिंदुत्व किंवा सार्वजनिक गणेशोत्सव नाही. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय ऐक्याच्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सामाजिक सुधारणा, राष्ट्रीय जागृती, लोकरंजनातून शिक्षण अशी सार्वजनिक गणेशोत्सवाची उद्दिष्टे पुढे जात राहिली. सार्वजनिक सोहळ्यात काळानुसार बदल होत राहिले, पण त्याचे पावित्र्य काही कमी होऊ दिले गेले नाही. महाराष्ट्राच्या

सांस्कृतिक जीवनावर
निःसंशय या उत्सवाने आपला ठसा उमटवला आहे. जनजागृती, मनोरंजन याप्रमाणेच अनेक सार्वजनिक मंडळे दानपेटीतल्या रकमांतून जनसेवा करीत असतात. गणेशोत्सवाचा मंच हा कधीकाळी अनेक कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ होते. आता ते तसे राहिले आहे काय? भक्तिगीते, व्याख्याने, नाट्य प्रवेश, वादविवाद स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, संगीत खुर्ची अशा प्रकारचे कार्यक्रम गणेशोत्सव काळात होत. त्यांची जागा आता ‘डीजे’वाल्या बाबूंनी घेतली व मंडळा मंडळांत कर्कश आवाजांच्या स्पर्धा सुरू झाल्या. वर्गणीसाठी जबरदस्ती करणे, कर्णकर्कश आवाजात गाणी लावणे, मंचावर उपऱ्यांची ठुमकेवाली नृत्ये लावणे ही काही सार्वजनिक गणेशोत्सवांची परंपरा नाही. आता तर मुंबई-पुण्यातील मोठे उद्योगपती महत्त्वाच्या सार्वजनिक उत्सवांत कोट्यवधींच्या देणग्या देऊन सण-उत्सवांवर वर्चस्व प्रस्थापित करत आहेत. पुण्यातील गणेशोत्सवातील गेल्या काही काळातले चित्र विद्रूप आहे. या काळात पुणे हे अधिक गजबजलेले असते. पुण्यात पै-पाहुण्यांची रीघ लागते. परदेशस्थ पुणेकरही आपल्या गावी उत्सवासाठी येतात. मंडळांच्या विविध मंडपांत ते जातात. त्यांना धार्मिक व आध्यात्मिक वातावरण हवे असते. उत्सवाच्या निमित्ताने शहरांची कोंडी होते. तेसुद्धा सहन केले जाते, पण ‘डीजे’वाल्या बाबूंचा जाच थांबवा असे पुणेकर सांगतात तेव्हा त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे.

गुडलक चौकात
जमलेल्या शेकडो पुणेकरांनी घोषणा दिल्या की, ‘‘डीजे बंद करा, पुण्याची संस्कृती जपा. गोंगाट नको, आरती ऐकू द्या.’’ पुणेकरांचे हे आंदोलन उद्या हिंदुत्वविरोधी ठरवले जाईल. गुडलक चौकात जमलेले ‘दिमागी नक्षल’ आहेत असा अपप्रचार होईल. कारण सध्या हिंदुत्वाला आणि संस्कृतीला विकृत वळण लावण्याचे काम नेटाने चालले आहे. गुडलक चौकातील ‘डीजे’विरोधी आंदोलनास परकीय पैसा मिळाल्याची बोंब ठोकायलाही हे लोक कमी करणार नाहीत. महाराष्ट्रीय समाजातील अनेक सुधारणावादी, पुरोगामी पुढारी पुण्यातच जन्मले व त्यांनी सामाजिक आंदोलनांना दिशा दिली. टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव ही एक सामाजिक एकोप्याची चळवळच होती. आता या चळवळीचा ‘कर्कश डीजे’ झाला आहे. तरीही चांगली बाब अशी की, पुण्याच्या गणेशोत्सवाची पारंपरिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी पुण्यनगरीतील दोनशेहून जास्त गणेश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे ‘डीजे’मुक्त ठेवून पारंपरिक ढोल-ताशे, बॅन्ड, सांस्कृतिक मराठी कार्यक्रमांना प्राधान्य देऊ असे जाहीर केले. त्यांचे पुढारीपण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ करीत आहे. त्याबद्दल ते कौतुकास पात्र आहे. डीजेवाले बाबूंच्या विरोधात पुणेकरांचा आवाज बुलंद असल्याचे हे लक्षण आहे!