
‘उपोषणाचा १७ वा दिवस आहे. पाणी, सलाइन बंद केल्यामुळे पोटात खड्डा पडला आहे. पण मी हार मानणार नाही. गणेशोत्सवाचे निमित्त पुढे करून मराठ्यांना मुंबईत येण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे मी एकटाच मंगळवारी मुंबईकडे प्रयाण करणार आहे. गोदापट्टा आणि महाराष्ट्राशी कदाचित ही शेवटची भेट असू शकते,’ असे भावुक अंतःकरणाने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील म्हणाले.
गणेशोत्सव, तसेच मागच्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता, यावेळी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारली. या पाश्र्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. गणेशोत्सवाचे निमित्त पुढे करून सरकारने मराठ्यांशी उभा दावा मांडला आहे. आंदोलनात लोक घुसवून दंगल घडवायची आणि नंतर गोळीबार करून आंदोलन चिरडण्याचा कट सरकार पातळीवरून रचण्यात आला आहे. पण कोणत्याही परिस्थितीत मराठा समाज पराभूत होता कामा नये, असे मनोज जरांगे म्हणाले.
कुणीही मुंबईत येऊ नका, योग्य वेळ आल्यावर सांगेन
कुणीही मुंबईत येऊ नका, केव्हा मुंबईत यायचे हे मी सांगेन. मी सकाळी एकटाच मुंबईकडे निघणार आहे. उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे. आता तर सलाईनही नसल्यामुळे पोटात आगडोंब उसळला आहे. त्यामुळे मदतीसाठी चार-पाच जण माझ्यासोबत असतील. गोदापट्टा आणि महाराष्ट्राशी माझी ही कदाचित शेवटची भेट असेल. मला निरोप देण्यासाठी रस्त्यावर या, पण कुठेही सत्कार नको, जेसीबीने फुले उधळू नका. पण माझ्या विश्रांतीसाठी रस्त्यावर व्यासपीठ करा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारली
मनोज जरांगे यांच्या वतीने आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. दुसऱ्यांदा जरांगे यांच्या समर्थकांनी परवानगीसाठी अर्ज केला. मात्र दुसऱ्यांदाही पोलिसांनी उपोषणाची परवानगी नाकारली. गणेशोत्सवानंतर आझाद मैदान वगळता इतर पर्यायी जागेसाठी नव्याने अर्ज केल्यास प्राप्त परिस्थितीनुसार विचार करण्यात येईल, असेही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परवानगी नाकारण्याचे कारण गेल्या वर्षी मराठा आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईत हजारो वाहने अनधिकृतपणे उभी राहिल्याने वाहतूक ठप्प होऊन कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
सोमवारपासून गणेशोत्सव सुरू झाला असून, या काळात मुंबईत भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा काळ अत्यंत संवेदनशील समजला जातो. आझाद मैदानावर नियमानुसार पाच हजार आंदोलक सामावू शकतात, मात्र मनोज जरांगे यांनी लाखोच्या संख्येने आंदोलकांना येण्याचे आवाहन केले आहे. एवढ्या संख्येने आंदोलक आल्यास दक्षिण मुंबईतील जी.टी., कामा, सेंट जॉर्ज, बॉम्बे हॉस्पिटल तसेच न्यायालय आणि आर्थिक केंद्रांच्या कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
विनापरवानगी येतोय…
‘दोन वेळेस परवानगी मागितली, नाकारली. मराठ्यांची गर्दी होणार म्हणून परवानगी नाकारली. आता मी एकटाच येतोय. आता नाक आहे का परवानगी नाकारायला?’ असा संतप्त सवाल मनोज जरांगे यांनी केला. ‘आता परवानगी नाकारली तर कोट्यवधी मराठे मुंबईत धडकतील,’ असा इशाराही त्यांनी दिला.
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन अयोग्य
‘माराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. ज्या काही मागण्या शिल्लक आहेत, त्या न्यायालयात असून, घटनेच्या चौकटीतच त्यावर निर्णय होऊ शकतो. सध्या गणेशोत्सवाचे पर्व सुरू आहे. त्यामुळे मुंबईत आंदोलन करणे सर्वथा अयोग्य असून, या आंदोलनाचा पुनर्विचार व्हावा,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ‘कायद्याच्या चौकटीत जे बसेल ते करण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही चर्चेचे दरवाजे कधीही बंद केलेले नाहीत,’ असेही फडणवीस म्हणाले.



























































