
सण उत्सवांच्या दिवसांत देशात महागाईचा भडका आणखी उडाला असून, किरकोळ महागाईचा दर ४.८२ टक्क्यांपर्यंत, तर घाऊक महागाईचा निर्देशांक ९.९२ टक्क्यांवर गेला आहे. अन्नधान्य, तेल, कांदा, लसूण, बहुतांशी जीवनावश्यक पदार्थांच्या किमती वाढल्यामुळे सामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने आगामी पतधोरणात रेपो रेटमध्ये वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे गृहकर्ज, कार लोनसह सर्वच कर्जाचे हप्ते वाढणार आहेत.
जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर ४.४५ टक्के होता. ऑगस्टमध्ये हा दर ४.८२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. रिझर्व्ह बँकेने ४ टक्क्यांपर्यंत किरकोळ महागाईचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, सलग तिसऱ्या महिन्यात हा दर वाढतच आहे.
कमकुवत मान्सूनचा परिणाम जाणवतोय ‘एल निनो’च्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत कमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचा परिणाम खरीप पिकांवर झाला असून, अन्नधान्याचे दर भडकल्याचे सांगण्यात येते. कांदा, लसूण, आले, भाज्या आणि बहुतांशी जीवनावश्यक पदार्थांच्या किमती वाढल्या. खाद्यतेलही महागले आहे.
घाऊक महागाईची वाटचाल १० टक्क्यांकडे
केंद्र सरकारने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नपदार्थ, इंधन, वीज आणि अनेक वस्तूंच्या दरवाढीमुळे घाऊक महागाईचा निर्देशांक ९.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. १० टक्क्यांकडे घाऊक महागाईची वाटचाल सुरू आहे. जुलैमध्ये हा दर ९.७२ टक्के होता. अन्नपदार्थांच्या निर्देशांकामध्ये ६.६५ वरून ७.०५ टक्के इतकी वाढ झाली आहे. उत्पादित वस्तूंचा महागाईदर जुलैमध्ये ८.२९ टक्के होता. ऑ गस्टमध्ये ८.३७ टक्क्यांवर गेला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा महागाईचा दर २६.९९ टक्क्यांवरून ३४.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
रिझर्व्ह बँकेने टेन्शन वाढवले; रेपो दर वाढणार
रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात आपला रेपोदर ५.२५ टक्के कायम ठेवला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी पतधोरण समितीच्या बैठकीत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यासह रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी सर्वच क्षेत्रांमध्ये महागाई वाढल्यास रेपोदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी पतधोरणात रेपो रेट वाढल्यास बँकांचे कर्ज महाग होण्याची शक्यता आहे.
मोदी म्हणतात, ‘सब चंगा सी !’ पण प्रत्यक्षात ‘सब महंगा सी!’
वाढत्या महागाईवरून काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर केली आहेत. ‘पंतप्रधान मोदी वारंवार ‘सब चंगा सी’ असा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात ‘सब महंगा सी’ आहे,’ अशी टीका रमेश यांनी केली आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सतत वाढत आहेत. त्यामुळे कोट्यवधी कुटुंबांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे, याकडेही रमेश यांनी लक्ष वेधले.



























































