राजधानी दिल्लीसह गुजरात, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेशात मुसळधार; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, यात्रा स्थगित; बिहारच्या 14 जिल्ह्यांत महापूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सप्टेंबर महिन्यात दहा ते बारा राज्यांत पावसाच्या तुफानाने हाहाकार उडवला आहे. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशात बसला असून, यावर्षी अडीचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत हजारो लोक बेपत्ता असून, अनेक घरे, शाळा, रस्ते वाहून गेले. यादरम्यान केदारनाथ यात्रेला यावर्षी पावसाचा फटका बसला असून, यात्रा तिसऱ्यांदा स्थगित करण्याची वेळ आली आहे. मार्गावर भूस्खलन झाल्याने भाविकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. बिहारमध्ये १४ जिल्ह्यांत महापूर आला आहे. केंद्रीय हवामान विभागाने राजधानी दिल्लीसह गुजरात, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

जूननंतर मान्सून उशिरा दाखल झाल्यानंतर जुलै महिन्यात पाऊस गायब झाला होता. आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची समस्या गंभीर बनत चालली आहे. उत्तराखंडमध्ये विविध ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रविवारी केदारनाथमधील चिरबासा हेलिपॅड जवळ डोंगरावरून दगड कोसळल्याने एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. केदारनाथ ट्रेकिंग मार्गावरही दरड कोसळल्याने यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भीमबली आणि केदारनाथदरम्यान १ हजार भाविक अडकले आहेत.

बिहारमध्ये १४ जिल्ह्यांतील २३६० गावे पुराचा सामना करत आहेत. त्याचा फटका ४८ लाखांहून अधिक लोकांना बसला आहे. राज्यातील आठ नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. गंगेच्या वाढत्या पाणी पातळीमुळे, कोलकाता ते वाराणसी प्रवासावर असलेली ‘राजमहल’ ही क्रूझ गेल्या सहा दिवसांपासून भागलपूरमध्ये अडकून पडली आहे. रविवारी या क्रूझवरील ११ पर्यटकांना नऊ परदेशी नागरिकांसह सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. राजस्थानमधील ३६ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भोपाळसह मध्य प्रदेशातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. बडवानीमध्ये नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. मोरेना येथे चंबळ नदीत अंघोळ करताना पिता-पुत्र बुडाले. हरियाणात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यमुनानगरमध्ये मुसळधार पाऊस आणि विजा पडण्याचा इशारा दिला आहे. १७ सप्टेंबरपर्यंत हवामान असेच राहण्याचा अंदाज आहे.

धुधवा धरणावर मामा-भाचे वाहून गेले, झुडपांत मृतदेह आढळले

देशात अनेक राज्यांत नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामध्ये धरणे आणि मध्यम प्रकल्प भरगच्च भरले आहेत. यादरम्यान छत्तीसगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत बस्तरमध्ये जोरदार पाऊस झाला. धमतरी येथील धुधवा (मोदामसिली) धरणावर वाहून गेलेल्या मामा आणि भाच्याचे मृतदेह घटनास्थळापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या झुडपांमध्ये सापडले. नागरिकांनी बाहेर पडताना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.