
ओडिशातील बालासोरमधील घनदाट जंगलात पाच अत्यंत दुर्मिळ ओरांगुटान अत्यंत दयनीय अवस्थेत सापडल्याची घटना अलीकडेच घडली आहे. आंतरराष्ट्रीय तस्करांनी जंगलात सोडून दिलेल्या ओरांगुटान बालासोरमधील प्रतिक इंदलकर या मराठमोळ्या विभागीय वन अधिकाऱ्यासह त्यांच्या टीमने या दुर्मिळ माकडांच्या पिलांना जीवदान दिले आहे. वन्यप्राण्यांच्या या आंतरराष्ट्रीय तस्करीची थेट पंतप्रधान कार्यालयापासून (पीएमओ) केंद्रीय गृह मंत्रालयाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे.
स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हे पाच ओरांगुटान दिसताच त्यांनी विभागीय वन अधिकारी प्रतिक इंदलकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली. मूळ देशातून हजारो किलोमीटर दूर असलेल्या मलेशिया-इंडोनेशियातील उष्णकटिबंधीय जंगलात सापडणारे ओरांगुटान ओडिशातील जंगलात सापडल्यामुळे वन विभाग सतर्क झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना त्वरित केळी, फळे, ज्यूस, आवश्यक औषधे दिली आणि त्वरित भुवनेश्वरमधील नंदनकानन प्राणी संग्रहालयात नेण्याचा निर्णय घेतला. वन अधिकारी प्रतिक इंदलकर, रेंजऑफिसर शिशिर बेहरा, फाँरेस्टर संजय महंती व त्यांच्या टीमने सुरुवातीलाच काळजी घेतल्याने या पिलांचा जीव वाचला. अन्यथा ही पिले जंगली श्वापदांच्या भक्ष्यस्थानी पडली असती. ओरांगुटान तस्करीमागे आंतराष्ट्रीय रॅकेट असल्याचा प्राथमिक संशय आहे. ओडीशा सरकारने एटीएसमार्फत चौकशी सुरू केली आहे.



























































