दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप, 25 हजार मूर्तींचे विसर्जन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात मुंबईकर गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या गणरायांना मंगळवारी भावपूर्ण निरोप दिला. पावसाच्या संततधारेत मुंबई आणि उपनगरांतील विसर्जन सोहळा पार पडला. रात्री 11 वाजेपर्यंत 25231 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये घरगुती 24521, सार्वजनिक 110 गणेशमूर्ती असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली.

मुंबई महापालिकेने दोन वर्षांपासून समुद्र, नैसर्गिक तलाव या ठिकाणी मुंबई शहर आणि उपनगरातील 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई केली आहे. त्यासाठी पालिकेने सुमारे 383हून अधिक कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी, स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

14 सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थीला सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता श्रीगणेशाचे आगमन वाजतगाजत झाले होते. मात्र दीड दिवस आपल्या लाडक्या गणेश भक्तांच्या घरात विराजमान झाल्यानंतर आणि भक्तांना कृपाशीर्वाद दिल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त हाक देत आणि गुलाल उधळत गणरायांच्या विसर्जनाला सुरुवात झाली.

या वेळी रस्त्यांवर गणेश भक्तांची गर्दी लोटल्याने रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विसर्जन स्थळे गर्दीने फुलून गेली. संध्याकाळी मोठय़ा प्रमाणात गणेशमूर्ती विसर्जन स्थळी मार्गस्थ झाल्या. ढोल ताशा, टाळ मृदुंग, मुखी बाप्पाचा जयघोष आणि आरती  करत गणेशभक्तांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

महापौर निवासस्थानातील दीड दिवसांच्या गणरायाचे  विसर्जन झाले. महापौर निवासस्थानी विराजमान झालेली मूर्ती पर्यावरणपूरक शाडू मातीची होती.

पालिकेच्या प्रभादेवी शाळेतील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी रितिक पासवान याने स्वतःच्या हाताने बनवलेली, शाडू मातीची छोटी गणेशमूर्ती मागील आठवडय़ात महापौर रितू तावडे यांना भेट दिली होती. महापौरांनी याच मूर्तीची निवासस्थानी प्रतिष्ठापना केली. या वेळी रितिक व त्याची आई उपस्थित होते.