बाप्पा पावला… धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; सातही तलाव तुडुंब; मुंबईकरांची चिंता मिटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वांचा लाडका बाप्पा पावसाला सोबत घेऊन आल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणार्या सातही  तलावांत जोरदार पाऊस सुरू असून सद्यस्थितीत 1425575 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. मुंबईला दररोज होणारा 3800 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा पाहता हे पाणी पुढील सप्टेंबरपर्यंत पुरणारा आहे. त्यामुळे मुंबईचा पाणी प्रश्न मिटला आहे.

शनिवारी आणि रविवारी मुंबई आणि उपनगरांना पिण्याचा पाणीपुरवठा करणार्या सातही प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठयात समाधानकारक वाढ झाली आहे.  महानगरपालिकेने  जाहीर केलेल्या  अहवालानुसार, या सातही तलावांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा तब्बल 98 टक्क्यांवर पोहोचला आहे.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱया भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडकसागर, विहार आणि तुळशी या सातही तलावांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता सुमारे 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतकी आहे. यातून मुंबई, ठाणे, भिवंडी आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागांना दररोज 4100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. तलावांमध्ये 353 दिवस इतका पाणीसाठा केला जातो. मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, या जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या 97.94 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

वार्षिक गरजेनुसार उपलब्ध पाणीसाठा

मुंबई शहराला दैनंदिन वापरासाठी दररोज सुमारे 3800  दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मान्सून हंगाम संपताना म्हणजेच 1 ऑक्टोबरपर्यंत या धरणांमध्ये 100 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्यास शहराला पुढील पावसाळ्यापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करणे शक्य होते. सध्याच्या आकडेवारीनुसार एकूण पाणीसाठा जवळपास 98 टक्क्यांवर पोहोचल्याने वर्षभराच्या नियोजित कोटय़ाची पूर्तता पूर्ण होण्याच्या उंबरठय़ावर आहे.

भातसामध्ये 100 टक्के पाणी

भातसा तलावाची क्षमता 7,17,037 दशलक्ष लिटर आहे. भातसा तलाव कधी 100 टक्के भरत नाही. याआधी भातसामध्ये 2022 मध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला होता. आता यावर्षी भातसा तलाव भरला आहे.