गणेशोत्सवात एफडीएच्या कारवायांचा धडाका; प्रसादासाठी वापरले जाणारे लाखोंचे भेसळयुक्त तूप जप्त, 18 आस्थापनांचे परवाने निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवाच्या काळात अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवायांना वेग आला आहे. गणपतीमध्ये प्रसादासाठी वापरले जाणारे जिन्नस चांगल्या दर्जाचे असावेत याकडे एफडीएचे कटाक्षाने लक्ष आहे. त्यानंतरही निकृष्ट दर्जाचे तूप, खवा, गूळ, पेढे आणि मिठाई विकली जात असून एफडीएने आज राज्यातील 18 आस्थापनांवर धाड घालून हजारो किलो भेसळयुक्त तूप व अन्य पदार्थ असा 10 हजार 836 किलोंचा साठा जप्त केला. त्यांची किंमत 30 लाखांपेक्षा जास्त आहे.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या मालाडमधील गुरूकृपा डेअरीवर धाड घालून 4 हजार किलो भेसळयुक्त तूप जप्त केले. तुपाच्या डब्यांवर पूजा तूप या ब्रॅन्डचे लेबल लावले गेल्याचे त्यांना आढळले. याची पिंमत 15 लाखांपेक्षा जास्त आहे. मुंबईतल्या 5 आस्थापनांची तपासणी करत त्यांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत. मालाडसह वर्सोवा, महालक्ष्मी आणि वांद्रे पश्चिम येथील हॉटेल, रेस्टॉरंट, धाबा, क्लब आणि बेकरीवर कारवाई करत त्यांचे परवाने एफडीएने निलंबित केले आहेत.

मुंबईसह चंद्रपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक व अन्य भागांमध्येही एफडीएने कारवाई करत भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त केला. भेसळयुक्त, चुकीचे लेबल लावलेले आणि निकृष्ट दर्जाचे तूप, खवा, पेढा, गूळ, तेल, चहा पावडर, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांचा त्यात समावेश आहे.