
मध्य प्रदेशच्या खांडवा येथील तरुणाचा सीएसएमटी स्थानकात पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे सोपवण्यात आला आहे.
मृत तरुण हा रोजगाराच्या शोधात खांडवा येथून मुंबईत आला होता. रविवारी दुपारी मृत तरुणाने रेल्वे सुरक्षा बलाच्या चौकीजवळ जाऊन खांडवाला जाणाऱ्या एक्सप्रेसबाबत विचारणा केल्याचे समजते. त्याला काही लोक मारण्याचा प्रयत्न करत असून ते खांडवा रेल्वे स्थानकात त्याची वाट पाहत उभे आहेत असे त्याने आरपीएफच्या कर्मचाऱ्याला सांगितले. त्यानंतर आरपीएफच्या कर्मचाऱ्याने त्याला खांडवाला जाणाऱ्या एक्सप्रेसची माहिती दिल्यानंतर तो तरुण हा आक्रमक झाला. त्याने आरपीएफच्या उपनिरीक्षकावरच हल्ला केला. तसेच त्याने स्वतःलाही दुखापत करून घेतली. मात्र पोलिसांनी त्याला आवरले आणि ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी त्याला प्रसाधनगृहात जाण्याची परवानगी दिली. प्रसाधनगृहात गेल्यानंतर सात-आठ मिनिटांनंतर त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अधिकाऱ्याने दरवाजा उघडला असता तो बेशुद्धावस्थेत आढळून आला. पोलिसांनी तातडीने त्याला सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही बाबींचा उलगडा होणार आहे.
झडतीत दोन रेल्वे तिकिटे सापडली
ओळख पटेल असे त्याच्याकडे काहीच आढळून आले नाही. पोलिसांना 18 सप्टेंबरचे खांडवा-भुसावळ रेल्वे तिकीट आणि 19 सप्टेंबरचे नाशिक-दादर असे तिकीट मिळून आले.



























































