
वीज, पाणी, दुष्काळ, शेतीचे नुकसान आणि ग्रामीण भागातील वाढत्या संकटाविरोधात शेतकऱ्यांचा संतापअखेर रस्त्यावर उतरला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरात झालेल्या महाएल्गारात बैलगाडय़ा, ट्रक्टरसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले. ‘सरकार झोपले आहे, जागं येत नसेल तर तुमची जागा बदलू’, असा इशारा देत वीज, पाणी, दुष्काळ आणि शेतीच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी थोरात यांनी केली.
ग्रामीण भागातील वीजपुरवठय़ाच्या लपंडावाचा मुद्दा महाएल्गारात केंद्रस्थानी राहिला. अनेक गावात वारंवार वीजखंडित होत असल्याने शेतीची कामे खोळंबतात, पिकांना पाणी देता येत नाही आणि शेतकऱयांचे आर्थिक नुकसान होते, अशी तक्रार करण्यात आली. सबस्टेशनमधील बिघाड, स्मार्ट मीटरची सरासरी बिले आणि वाढत्या वीजबिलांचाही प्रश्न उपस्थित झाला. शंभर टक्के दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत वीजप्रश्न तातडीने सोडविला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
दुष्काळाच्या प्रश्नावरही सरकारला लक्ष्य करण्यात आले. नुकसानीची टक्केवारी आणि निकषांच्या चौकटीत शेतकऱयांना अडकवण्याऐवजी पावसाअभावी झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीचा सर्वंकष विचार करून मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. ‘अच्छे दिन आले नाहीत, उलट संकटे वाढली’, असा संताप व्यक्त करत कर्जबाजारी शेतकऱयाला ठोस मदतीची मागणी केली. फ्लेक्स, फोटो आणि प्रसिद्धीच्या खर्चावरही मोर्चातून निशाणा साधण्यात आला. हजारो रुपयांचे फलक उभारण्यापेक्षा संकटात सापडलेल्या शेतकऱयाच्या हातात मदतीचा पैसा द्या, असा सवाल आंदोलकांनी केला. हक्काच्या पाण्याचा मुद्दाही यावेळी गाजला.
डॉ. जयश्री थोरात यांनी महापारेषण आणि वीज वितरणाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरत, ‘तुम्हाला देश सांभाळता येत नसेल, तर आमच्या ताब्यात द्या’, असा घणाघात केला.
प्रांताधिकारी अरुण उंडे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित नसल्याने शेतकऱयांचा संताप वाढला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
संतापाचा कडेलोट; प्रांत कार्यालयात धडक
प्रशासनाकडून प्रश्न ऐकून घेण्याची तयारी नसल्याचा आरोप करत संतप्त मोर्चेकऱयांनी अखेर प्रांत कार्यालयाच्या प्रवेशद्वाराकडे धाव घेतली. आंदोलकांनी मुख्य गेट ओलांडून कार्यालयात प्रवेश केला. यावेळी कार्यालयातील खुर्च्या व टेबल फेकण्यात आल्या. अचानक निर्माण झालेल्या तणावामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस व प्रशासनाला अतिरिक्त मनुष्यबळासह हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
आमदारांचे फ्लेक्स लावणे हे प्रांताधिकाऱयांचे काम नाही
हजारो शेतकरी निवेदन घेऊन आले असताना प्रांताधिकारी उपस्थित नसल्याबद्दल बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. राजकीय दबावाखाली प्रशासन काम करत असल्याचा आरोप करत, ‘आमदारांचे फ्लेक्स लावणे हे तुमचे काम नाही; तुम्ही त्यांचे गुलाम झाला का?’, असा सवाल केला. दरम्यान, मोर्चाची माहिती मिळताच आपण तातडीने आलो, असे स्पष्टीकरण देत प्रांताधिकारी उंडे यांनी निवेदन स्वीकारले.






























































