
>> प्रभाकर पवार, [email protected]
बांगूर पोलीस गेल्या आठवड्यात ‘ईडी’च्या (Enforcement Directorate) मोहित गर्ग (वय ३६ वर्षे सहाय्यक संचालक, जयपूर) व देवेंद्र कुमार गुप्ता, (वय ३५ वर्षे अंमलबजावणी अधिकारी, जयपूर) या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध अटकेची भीती दाखवून एका उद्योजकाकडून २ कोटी २५ लाख रुपये उकळले या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव, बांगूर नगर येथील विंट्री टेक कार्यालयावर अंमलबजावणी कंपनीच्या संचालनालयाच्या वरील दोन अधिकाऱ्यांनी धाड घालून कंपनीचे मालक अमूल्य वास्सा यांच्याकडे अटक न करण्यासाठी पाच कोटी रुपयांची, दोन अॅपल आयफोनची व दरमहा हप्ता देण्याची मागणी केली होती. म्हणजेच, संरक्षणाच्या बदल्यात Protection Money ची मागणी केली, अमूल्य वास्सा यांनी आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी घाबरून २ कोटी २५ लाख रुपये मोहित गर्ग व देवेंद्र कुमार गुप्ता यांना दिले तरीही या दोन अधिकाऱ्यांनी पैसे मागणे सुरूच ठेवले. पाच कोटी रुपये न दिल्यास मनी लॉण्डरिंगच्या Proceeds of Crime या गुन्ह्यात गोवण्याची धमकी अमूल्य वास्सा यांना दिली त्रस्त झालेल्या अमूल्य वास्सा यांनी अखेर दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबई माझगांव येथील ‘ईडी’चे अतिरिक्त संचालक मयांक पांड यांच्याकडे लेखी तक्रार केली अमूल्य वास्सा यांच्या तक्रारीची श्रवणकुमार रेड्डी कुंडेला या सहाय्यक संचालकाकडून शहानिशा करण्यात आली. त्यात तथ्य आढळून आल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध श्रवणकुमार रेड्डी बुंडेला यांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला खंडणी उकळल्याच्या आरोपावरून ईडीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध ईडीच्याच अधिकाऱ्यांनी मुंबईत गुन्हा दाखल करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते.
आपल्या देशात भाजप सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यानंतर, विशेषतः २०१९ नंतर ईडीच्या कारवाया प्रचंड पटीने वाढल्या. मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये सुरुवातीला भाजप काळात दरवर्षी दीडशे ते दोनशे गुन्हे दाखल होत होते, परंतु २०१९ नंतर त्यात कैक पटींनी वाढ झाली. २०२० ते २०२४ दरम्यान दरवर्षी ९०० ते १००० केसेसची नोंद झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात तर ‘ईडींच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आतंक माजविला. बडे बडे व्यापारी, उद्योजक, खासदार, आमदार यांना मनी लॉण्डरिंगच्या नावाखाली नोटिसा पाठवून आत्मसमर्पण व पक्षांतर करावयास भाग पाडले. ईडीने नोटिसा पाठवून भाजपचा जसा फायदा करून दिला तसे आपलेही उखळ पांढरे करून घेतले. मनी लॉण्डरिंगची भीती दाखवून ईडीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना आपल्या एजंटमार्फत धमकावण्यास सुरुवात केली.
मुंबईसह देशभरात फैलावलेल्या ईडीच्या एजंटनी ईडीची भीती दाखवून करोडो रुपये कमविले. त्यातील मुंबईच्या खार येथील हिरेन रमेश भगत (५२) (Liason Agent) या मुंबईतील ईडीच्या दलालाचे नाव घेता येईल. २०२४ च्या फेब्रुवारी महिन्यात मुंबई डिटेक्शन क्राईम ब्रँचच्या वांद्रे युनिटने (युनिट क्र. ९) हिरेन ऊर्फ रोमी व त्याच्या अन्य पाच साथीदारांना ईडीच्या नावाने धमकावून खंडणी उकळल्याच्या आरोपावरून अटक केली होती. रोमी याची आयएएस व आयपीएस आणि ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये नियमितपणे ऊठबस असायची. त्यामुळे तपासातील गोपनीय कागदपत्रे रोमीला सहज उपलब्ध व्हायची. ज्या व्यावसायिकांविरुद्ध खंडणी उकळायची आहे. त्या व्यावसायिकांविरुद्ध रोमीच आपल्या साथीदारांना ईडीकडे मनी लॉण्डरिंग केसमध्ये गुंतविण्यासाठी तक्रार करायला सांगायचा. त्या तक्रारीच्या आधारावर रोमी ईडी अधिकाऱ्यांच्या नावाने प्रकरण दाबण्यासाठी व्यावसायिकांशी संपर्क साधायचा आणि खंडणी उकळायचा. त्यातून तो मालामाल झाला. रोमीच्या घरातच १३ किलो सोने व २ कोटी रुपयांची रोकड आढळून आली.
या रोमीला एका राजकीय नेत्याचाही आशीर्वाद होता. त्यामुळे रोमीच्या नावाची मुंबईतील व्यावसायिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर रोमी व त्याच्या अन्य पाच साथीदारांवर खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली, तर रोमीला मदत करणाऱ्या मुंबईतील एका ईडी अधिकाऱ्याची तडकाफडकी मुंबईबाहेर बदली करण्यात आली. हिरेन भगत ऊर्फ रोमीसारख्या दलालांनी मुंबईसह देशभरात ईडीच्या नावाने हैदोस घातल्याने ईडीच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मध्यस्थांची नेमणूक न करता थेट स्वतःच खंडणी वसुली सुरू केली, परंतु त्याचा उलटाच परिणाम झाला. ईडीचे वेगवान चपळ अधिकारी लाच घेताना सीबीआय व स्थानिक लाचलुचपत विभागाकडून रंगेहाथ पकडले जाऊ लागले. २०२३ ते २०२६ यादरम्यान सीबीआय व अॅण्टीकरप्शन अधिकाऱ्यांकडून लाच घेताना अटक करण्यात आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे-
- नवल किशोर मीना (अंमलबजावणी अधिकारी, ईओ) अॅण्टीकरप्शन ब्यूरोने १५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तत्काळ निलंबित.
- राजस्थान अंकित तिवारी (अंमलबजावणी अधिकारी, मदुराई) – तामीळनाडूच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० लाखांची लाच घेताना ट्रॅप केले.
- संदीपसिंग यादव (सहाय्यक संचालक, ईडी) – मुंबईतील एका ज्वेलर्सकडून २० लाखांची लाच घेताना सीबीआयकडून दिल्लीत अटक.
- चिंतन रघुवंशी (डेप्युटी डायरेक्टर, ईडी)-ओडिशामधील एका व्यावसायिकाकडून दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सीबीआयकडून अटक.
- पवन खत्री (सहाय्यक संचालक) व नितेश कोहार (अप्पर डिव्हिजन क्लर्क) या ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीच्या दारू घोटाळ्यातील आरोपींना अटक न करण्यासाठी पाच कोटींची लाच मागितल्याचे सीबीआय तपासात उघड झाल्यावर त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले.
- मोहित गर्ग व देवेंद्र कुमार गुप्ता या जयपूरच्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी मनी लॉण्डरिंगच्या केसमध्ये न अडकविण्यासाठी २ कोटी २५ लाख रुपये मुंबईच्या व्यावसायिकाकडून उकळण्यात आल्याचे उघड झाल्यावर मुंबईच्या बांगूर नगर पोलीस ठाण्यात खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- यापूर्वी महसूल व पोलिसांविरोधात भ्रष्टाचाराचे अधिक गुन्हे नोंदले जात होते. परंतु अलीकडे ईडी अधिकारी व त्यांच्या दलालांविरुद्ध खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल होत आहेत.
जयपूरचे ईडी अधिकारी मुंबईत येऊन खंडणी वसुली करतात. उद्योजकांकडे दरमहा प्रोटेक्शन मनी मागतात याला काय म्हणावे? मुंबई झोन एकचे अतिरिक्त संचालक मांक पांडे यांनी अमूल्य वास्सा यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन ईडीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे, परंतु अमूल्य वास्सासारखे असे कितीतरी पीडित व्यावसायिक ईडीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना घाबरून तक्रार करण्यास पुढे येत नाहीत त्याचे काय? याचाही मयांक पांडे यांनी शोध घ्यावा.


























































