
एमजीएम विद्यापीठाकडून शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच सन्मान मानद डी.लिट्. पदवी डॉ. आ. ह. साळुंखे यांना गेल्या आठवडय़ात प्रदान करण्यात आली. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अनेक दशकांच्या अध्ययन, संशोधन, लेखन आणि सार्वजनिक वैचारिक सहभागाचा गौरव करणारा हा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतील एका प्रदीर्घ वैचारिक प्रवासाची नोंद आहे.
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या विचारविश्वाच्या मुळाशी गेलो तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, त्यांना रूढ उत्तरे स्वीकारण्यापेक्षा प्रश्न विचारण्यात अधिक रस आहे. चार्वाकाकडे पाहताना त्यांनी त्याचा केवळ प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील एक अध्याय म्हणून विचार न करता त्याच्या चिकित्सक अभ्यासाला आपल्या संशोधनाचा विषय बनवले. त्यांच्या पीएच.डीचा विषयच ‘चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास’ हा होता. चार्वाकाचा अभ्यास त्यांच्या दृष्टीने माणसाला स्वतच्या बुद्धीचा वापर करण्याची जाणीव करून देणारा एक वैचारिक अनुभव होता. यातूनच पुढे आला त्यांचा ग्रंथ ‘आस्तिकशिरोमणी चार्वाक‘.
डॉ. साळुंखे यांच्या चार्वाकविषयक लेखनाचा गाभा समजून घेतला तर एक महत्त्वाची जाणीव होते की, विचार म्हणजे केवळ एखादी भूमिका स्वीकारणे नव्हे; तर त्या भूमिकेचीही चिकित्सा करणे होय. पण प्रश्न विचारणे हा त्यांच्या विचार प्रवासाचा शेवट नाही. प्रश्न विचारल्यानंतर पुढचा प्रश्न उभा राहतो की, या प्रश्नांमधून माणसाने काय शिकायचे? आणि इथे त्यांच्या विचारविश्वात गौतम बुद्ध प्रवेश करतात. ‘सर्वोत्तम भूमिपुत्र ः गौतम बुद्ध’ हा त्यांच्या लेखनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरतो. त्यांच्या उपलब्ध ग्रंथसूचीत या ग्रंथाबरोबरच बुद्धस्तोत्र, तथागत बुद्ध आणि संत तुकाराम, बुद्धांचे मंगलसुत्त आणि विवेक स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे बुद्धांचे कालामसुत्त यांसारख्या ग्रंथांचीही नोंद आहे.
चार्वाक विचारांना जागे करतो; बुद्ध त्या जाग्या विचारांना माणुसकीची ऊब देतात. आणि मग हीच विचारांची ज्योत महाराष्ट्राच्या मातीवर येते. तुकाराम महाराजांकडे पाहण्याची डॉ. आ. ह. साळुंखे यांची दृष्टी त्यांच्या वैचारिक प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरते. ‘विद्रोही तुकाराम’ हा या दृष्टीचा महत्त्वपूर्ण आविष्कार आहे. तुकोबांच्या अभंगांमधून केवळ आध्यात्मिक अनुभूती नव्हे, तर आपल्या भोवतालच्या समाज जीवनाकडे डोळसपणे पाहणारा, दांभिकतेला प्रश्न विचारणारा आणि माणसाच्या जगण्यातील विसंगतींना भिडणारा विचार डॉ. साळुंखे यांनी समोर आणला. पुढे ‘विद्रोही तुकाराम ः समीक्षेची समीक्षा’, ‘तथागत बुद्ध आणि संत तुकाराम’, ‘संत तुकारामांचे अभंग शतक‘ आणि ‘न सरे ऐसे तुकोबांचे दान!’ या ग्रंथांतून हा अभ्यास अधिक विस्तारत गेला. त्यामुळे त्यांच्या लेखनातील तुकाराम हे विवेक जागवणारे, रूढींना छेद देणारे समाज प्रबोधक म्हणून समोर येतात.
तर्प, करुणा आणि माणूसपण यांना एका वैचारिक चौकटीत समजून घेण्याचा हा प्रयत्न डॉ. साळुंखे यांच्या लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरते. कदाचित म्हणूनच त्यांच्या लेखनात ‘परंपरा’ हा शब्द आला की, त्याच्यासोबत ‘चिकित्सा‘ही येते आणि श्रद्धा‘ आली की, तिच्यासोबत ‘विवेक’ही उभा राहतो. त्यांनी परंपरेला नाकारण्यासाठी तिचा अभ्यास केला नाही; उलट तिच्या अनेक थरांमध्ये दडलेले आवाज शोधण्यासाठी तिच्याकडे पुन्हा पाहिले. त्यांच्या ग्रंथसूचीत ‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’, ‘महाभारतातील स्त्रिया’, ‘महात्मा फुले आणि धर्म’, ‘वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी’, ‘एकलव्य, शंबूक आणि झलकारीबाई’, ‘महात्मा फुले आणि शिक्षण’, ‘शिवराय ः संस्कार आणि शिक्षण’ यांसारख्या अनेक पुस्तकांचा समावेश आहे. या विविध विषयांकडे पाहिले तर त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी सतत एक मोठा प्रश्न दिसतो- इतिहास, धर्म, परंपरा आणि समाज यांचा विचार करताना माणूस कुठे उभा आहे?
हीच बाब त्यांच्या विद्वत्तेला केवळ ग्रंथालयीन विद्वत्ता राहू देत नाही. त्यांनी 32 वर्षे अध्यापन केले. शिवाजी विद्यापीठाच्या संस्पृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, कला शाखेचे अधिष्ठाता, अभ्यास मंडळांवरील सदस्य व अध्यक्ष म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम केले. महाराष्ट्राच्या सांस्पृतिक धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आणि बालभारतीच्या इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीच्या इतिहासाच्या पुस्तकांच्या संपादकीय समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या 65 प्रकाशित पुस्तकांची यादी पाहिली तरी हा प्रवास किती व्यापक आहे याची जाणीव होते. कधी चार्वाकाच्या माध्यमातून, कधी बुद्धांच्या माध्यमातून, कधी तुकोबांच्या अभंगातून, तर कधी फुले, शाहू, आंबेडकर, स्त्रिया किंवा बहुजनांच्या इतिहासातून त्यांनी समाजासमोर एक वैचारिक आरसा ठेवण्याचा प्रयत्न केला.
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या कार्याकडे मागे वळून पाहताना एक सुंदर वैचारिक वर्तुळ पूर्ण होताना दिसते. चार्वाकाकडून त्यांनी प्रश्नांची शिस्त घेतली; बुद्धांकडून माणूस आणि विवेक यांचा संबंध शोधला आणि तुकारामांकडून तो विचार लोकांच्या जगण्याच्या भाषेत ऐकला. या तिन्ही प्रवाहांना जोडणारा केंद्रबिंदू आहे- स्वतंत्र विचार करणारा माणूस. कदाचित त्यांच्या संपूर्ण लेखनाचा अर्थ एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा असेल की, परंपरेचा स्वीकार करण्यापूर्वी तिची चिकित्सा करा, श्रद्धेला विवेकाची साथ द्या आणि कोणत्याही विचाराच्या केंद्रस्थानी माणसाला विसरू नका.
आशुतोष पाटील
(विशेष कार्यकारी अधिकारी, कुलपती, एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर )




























































