
मुंबईत एकीकडे पाणीटंचाईने सामान्यांचे, झोपडीधारकांचे हाल होत असताना दुसरीकडे टँकरवाल्यांना सहज पाणी उपलब्ध होत आहे. पाणीवाटपाच्या असमान व्यवस्थेवरून महासभेत आज पुन्हा एकदा संतापाची ठिणगी पडली. मुंबईतील पाणीकपातीवरून सभागृहात निवेदन करत मुंबईकरांचे पाणी गेले कुठे, असा सवाल शिवसेनेने केला. त्यावर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. ‘टँकरवाल्यांना पाणी मिळते, मग झोपडीधारकांना का नाही?’ असा सवाल विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी करत प्रशासनाला धारेवर धरले.
पालिकेतील विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी सभागृहात निवेदन देताना पाणीवाटपावरून गंभीर आरोप केले. एकीकडे सामान्य मुंबईकर पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे शहरातील आलिशान खासगी संस्था, मोठे कारखाने, बिल्डरांचे व्यावसायिक प्रकल्प आणि खासगी जलतरण तलावांना मात्र मुबलक आणि अविरत पाणीपुरवठा केला जात आहे. हा दुभाभाव कशासाठी आणि कुणाच्या फायद्यासाठी सुरू आहे? प्रशासनाच्या या नियोजनशून्य आणि पक्षपाती धोरणामुळे मुंबईत पाण्याचे कृत्रिम संकट उभे राहिले आहे. याचा थेट फायदा खासगी टँकर लॉबीला होत आहे. ते सर्वसामान्य मुंबईकरांची आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे मुंबईकरांवर लादलेली अन्यायकारक 10 टक्के पाणीकपात तत्काळ आणि संपूर्ण मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली.
मुंबईतील झोपडपट्टी परिसरात नळजोडणी, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, कोळीवाडे-गावठाणांचा विस्कळीत पाणीपुरवठा, अनियमित वेळेमुळे नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण, टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम असे अनेक मुद्दे सभागृहात चर्चेला आले. शिवसेनेचे नगरसेवक चिंतामण निवाटे, हरी शास्त्राr यांनीही पाण्याचे असमान वाटप आणि पाणीगळती, दूषित पाणीपुरवठा यावर मत मांडले.
पाणीकपात कायम
जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईवरील संभाव्य जलसंकट तूर्तास टळले आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठय़ाच्या आधारे वर्षभर पाणीपुरवठय़ाचे नियोजन करणे शक्य आहे. मात्र सध्याचा पाणीसाठा साधारण 15 ते 17 मे 2027 पर्यंतच पुरेल असा अंदाज आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली. त्यामुळे तुर्तास मुंबईतील 10 टक्के पाणीकपात कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
2030 पर्यंत 1,040 एमएलडी अतिरिक्त पाण्याची अपेक्षा
मुंबईची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन अनेक मोठय़ा प्रकल्पांवर काम सुरू आहे. यामध्ये गारगाई प्रकल्पातून 440 एमएलडी, मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पातून 400 एमएलडी आणि वर्सोवा निःक्षारीकरण प्रकल्पातून सुमारे 200 एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. हे प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या पाणीपुरवठा क्षमतेत सुमारे 1,040 एमएलडीची वाढ होण्याची अपेक्षा आहे.
मुंबईत पावसाने उडवली तारांबळ
मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी सायंकाळी अचानक जोरदार बरसायला सुरुवात केल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. यामध्ये कामावरून घरी जाणाऱ्यांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. तिन्ही रेल्वे मार्गांवरील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.



























































