उरलेल्या सर्व तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात पहिल्या टप्प्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. पण अनेक तालुक्यांचा ट्रिगर-1च्या निकषांत बसत नसल्याने पहिल्या यादीत समावेश झालेला नाही. पण ज्या ठिकाणची पिके करपली आहेत अशा तालुक्यांची पुन्हा प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून त्यांचा दुसऱ्या यादीत समावेश करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील अनेक तालुके असे आहेत की, ज्यातील पिके करपली तरी ते ट्रिगर-1च्या निकषांत बसत नसल्याने त्यांचा समावेश पहिल्या यादीत झाला नसल्याचा मुद्दा अनेक मंत्र्यांनी मांडला. यंदा विचित्र परिस्थिती आहे. पहिले दोन महिने चांगला पाऊस पडला. नंतर पाऊसच नाही. त्यामुळे अशा तालुक्यांत प्रत्यक्ष गावागावांत जाऊन पाहणी करण्यात येईल. पिकाची करपलेली अवस्था पाहून त्यांना दुष्काळाचा फायदा द्यायचा अशी कार्यप्रमाणी ठरवली आहे. उपसमिती त्याची पाहणी करेल. ज्या तालुक्यांत खरोखर पिके करपली आहेत, पण पहिल्या यादीत ज्यांचे नाव नाही अशांचा निश्चितच दुसऱ्या यादीत समावेश करू. यासाठी मंडल स्तरावर जाण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

रोहयोतून 6 हजार 728 कोटी

दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि मजूर वर्गावर होतो. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजना विभागाने 6 हजार 728 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.