
ग्रामपंचायत असो, जिल्हा तळे परिषद असो की नगरपालिका.. तेथील प्रशासकीय कारभार तसेच संवेदनशून्य अधिकारी व कर्मचारी यांचा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना येतो. मात्र तळा तालुक्यातील चरई खुर्द ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबाने भावनिक नाते जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुणाच्या घरी मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी तीन हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसा ठराव मंजूर केला असून ग्रामपंचायतीचे कर्मचारी थेट घरी जाऊन मदतीचा धनादेश नातेवाईकांकडे सुपूर्द करणार आहेत.
अशा प्रकारची अनोखी मदत करणारी चरई खुर्द ही रायगड जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या कुटुंबात कुणाचा मृत्यू झाला तर आर्थिक सहाय्य देण्यासाठी ‘अंत्यविधी सहाय्य ‘ योजना’ सुरू करण्यात येणार आहे. तसा ठराव ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत व ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. दुःखाच्या प्रसंगी कुटुंबावर मानसिक आघाताबरोबरच अंत्यविधीचा अचानक आर्थिक भारदेखील येतो. अशावेळी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून चरई खुर्द ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.
मृत्यूची नोंद वेळेत होणार
ज्यांच्या घरात एखाद्याचा मृत्यू होईल तिथे ग्रामपंचायतीचा कर्मचारी प्रत्यक्ष जाऊन तीन हजार रुपयांचा धनादेश देणार आहे. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया सुलभ होण्याबरोबरच मृत्यूची नोंदही वेळेत करणे शक्य होईल असे सरपंच प्रवीण आंबार्ले यांनी सांगितले. ‘अंत्यविधी सहाय्य योजना’ ही त्यांचीच संकल्पना असून उपसरपंच अजय सावंत व अन्य सदस्यांनी त्यास पाठिंबा दिला.




























































