एका ताटात जेवलास, मग तू असं का केलं पप्प्या… प्रदीप पूर्णेकरांची पत्नी वैजयंती यांचा आक्रोश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पप्प्या शिंदे, तू माझ्या नवऱ्याला का मारलंस? तू त्याचा मित्र होतास ना? एका ताटात जेवलास, तुझ्या मुलाच्या बारशाला मी नवीन कपडे घेतले होते. कोणाच्या सांगण्यावरून त हे केलंस? असं का केलंस पप्प्या.. असा टाहो प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी वैजयंती यांनी फोडलाला.

माझ्या नवऱ्यावर इतके वार का केले? इतक्या गोळ्या का झाडल्या? इतकी फायरिंग करायला तो कोणी मंत्री होता का? त्याने तुमचे काय बिघडवलं होतं? असा सवाल वैजयंती पूर्णेकर यांनी केला. तो नशा पुरवणाऱ्यांविरुद्ध लढत होता. कारण नशेमुळे पोरं वाया जात होती. मी त्याला सांगत होते की, तू लढू नकोस, पण त्याने कोणाचेच एकले नाही.  लेकरं मागे टाकून तो गेला, असे सांगताना त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला होता.

मित्रानेच घात केला

पप्प्या शिंदे हा प्रदीप यांचा एकेकाळचा मित्र. महापालिका निवडणुकीनंतर दोघांचेही बिनसले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून शिंदे हा प्रदीप यांच्याकडे ये-जा करत होता. ज्या वेळी प्रदीप यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी पप्प्या हा प्रदीप यांच्या कार्यालयातच बसला होता. पूर्णेकर एकटे असल्याचे समजताच त्याने आपल्या साथीदारांना बोलावले. प्रदीप यांच्यावर हल्ला झाल्यावर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले तेव्हाही पप्प्या त्यांच्यासोबत गेला. तो हत्येच्या कटाचा भाग असल्याचा आरोप राम पूर्णेकर यांनी केला. पप्प्याविरोधात 9 गुन्हे दाखल असून त्याला तडीपारही करण्यात आले होते.

कडकडीत बंद

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा ठाणेकरांनी कडकडीत निषेध केला. आज संपूर्ण मानपाडा परिसरात बंद पाळण्यात आला. सगळी दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली.

मानपाडय़ात शाळांना सुट्टी

मानपाडा परिसरातील संकेत विद्यालय, महापालिका शाळा क्रमांक 28, महापालिका शाळा क्रमांक 155 आणि हरी ओम इंग्लिश विद्यालय या चारही शाळांना आज सुट्टी देण्यात आली होती.

पोलिसांना धारेवर धरताच अखेर पुरवणी जबाबात मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदे यांचे नाव

संशयित आरोपींना चौकशीसाठी कधीही बोलवा, पण त्यांचे नाव एफआयआरमध्ये दाखल करा. सध्या पुरवणी जबाब घ्या. नंतर तो मूळ एफआयआरला जोडा. ही हत्या आहे, कोणाच्याही दबावात राहू नका, असे संजय राऊत यांनी पोलिसांना बजावले. त्यानंतर पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांचा पुन्हा नव्याने जबाब घेण्यात आला. त्यात मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांचे नाव घेण्यात आले. हत्येची संपूर्ण घटना त्यात नोंदवण्यात आली आणि संशयित आरोपींच्या नावांचाही समावेश करण्यात आला.