विलास घुले प्रकरणात माझ्या पोराला गोवण्यासाठी ‘आकाने’ तुरुंगातून केला फोन, बजरंग सोनवणेंचा गौप्यस्फोट; पत्रकारांना ऐकवली रेकॉर्डींग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाल्मिक कराड याने तुरुंगातून फोन करून माझ्या मुलाला विलास घुले हत्या प्रकरणात अडकवण्याचे आदेश दिले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. बजरंग सोनावणे यांनी पत्रकार परिषद घेत त्यात जेलमधूनच वाल्मीक कराड फोनवर आदेश देतोय याची रेकॉर्डिंग ऐकवली. या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मीक कराड हा त्याच्या माणसांना विलास घुलेचा मृतदेह पोलीस ठाण्यात नेऊन ठेवण्यास सांगत असल्याचे ऐकायला मिळते.

केज तालुक्यातील टाकळी फाट्यावर असलेल्या हॉटेलमध्ये विलास घुलेची निर्घुण हत्या झाली होती. या हत्येच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. दहा आरोपींना अटकही करण्यात आले. या हत्येमध्ये बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचा हात असल्याचा आरोप सातत्याने विलास यांच्या नातेवाईकांकडून केला जातो. त्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलनही केली. विलास घुले हत्या प्रकरणात सौरभ सोनवणे यांचा सीडीआर काढा अशी मागणी वारंवार केली जाते. दरम्यान विलास घुले हत्या प्रकरणात सौरभ सोनवणे याचा कोणताही संबंध नसल्याचे पोलीस प्रशासनाने यापूर्वी सांगितले होते.

अलिकडेच सौरभ सोनवणे याच्या अटकेसाठी केजमध्ये रस्ता रोकोही झाला. या प्रकरणी आज बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रसार माध्यमांसमोर त्यांनी आपला मुलगा सौरभ सोनवणे याला गुंतवण्याचा कट कसा रचला हे सांगितले. ”वाल्मीक कराड जेलमधून बाहेर फोन करतो अन् फोनवरून बोलताना त्या पोराला गुंतवा, मढं पोलीस ठाण्यात ठेवा” अशी एक कॉल रेकॉर्डिग आज बजरंग सोनवणेंनी ऐकवली. या हत्येप्रकरणी वाल्मीक कराड याने सौरभ सोनवणेला गुंतवण्यासाठी कसा कट रचला हे सांगितले.