Beed News – दुष्काळातही मेहनतीला रेशीमची साथ; बीडच्या शेतकऱ्याने एका एकरात कमावले पावणेदोन लाख रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीषण दुष्काळामुळे एकीकडे मराठवाड्यात 49 लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून रब्बीचीही कोणतीही शक्यता उरलेली नाही. शेतकरी डोक्यावर कर्जाचा डोंगर घेऊन हवालदिल झाला असताना, दुसरीकडे रेशीम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने प्रतिकूल परिस्थितीतही रेशीम उत्पादनातून विक्रमी कमाई करत नवा आदर्श निर्माण केला आहे.

दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घाट येथील बोरदास वाघमारे या शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेतीपैकी चार एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली, तर एका एकरात रेशीम कोषाचे यशस्वी पीक घेतले. बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील स्व. विनायकराव मेटेसाहेब रेशीम कोष खरेदी केंद्रात त्यांच्या उत्पादनाला तब्बल 92 हजार 500 रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी भाव मिळाला. त्यांच्या या एक एकरातील रेशीम कोषाचे एकूण वजन 1 क्विंटल 79 किलो भरले, ज्यातून या भीषण दुष्काळातही त्यांना तब्बल 1 लाख 65 हजार रुपयांचा घसघशीत नफा मिळाला आहे.

दरम्यान, बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोष खरेदी केंद्रात आज एकूण 3 हजार 859 किलोग्राम रेशीम कोषाची आवक नोंदवली गेली. दुष्काळी परिस्थितीतही योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर बोरदास वाघमारे यांनी मिळवलेले हे यश मराठवाड्यातील इतर शेतकऱ्यांसाठी एक मोठी प्रेरणा ठरत आहे.