मुंबईच्या पाणी पुरवठय़ाला गळतीचे ग्रहण! आठ महिन्यांत 18 हजार तक्रारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या वर्षी झालेला कमी पाऊस आणि अनेक भागांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसताना पाणी पुरवठय़ाला गळतीचे ग्रहण लागल्याचे चिंता वाढली आहे. पालिकेने गळतीबाबत तक्रारी करण्यासाठी संकेतस्थळावर गेल्या आठ महिन्यांत तब्बल 18 हजार तक्रारी दाखल झाल्याची माहिती स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईत सध्या दहा टक्के पाणीकपात असली तरी प्रत्यक्षात यापेक्षा मोठय़ा कपातीचा सामना अनेक भागांत नागरिकांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी मुंबईतील पाणी पुरवठय़ाची स्थिती जाहीर केली. मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी 150 किमी अंतरावरून जलवाहिन्यांद्वारे मुंबईत पाणी आणले जाते. यासाठी हजारो कोटी रुपये खर्चून जलवाहिन्यांचे जाळे विस्तारले आहे. मात्र जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून त्यांची अवस्था जीर्ण झाली आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणावर पाणीगळती होत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बेकायदा कनेक्शनचा पुरवठय़ावर परिणाम

बेकायदेशीर नळ जोडण्यांमुळेही पुरवठय़ावर मोठा परिणाम होत आहे. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान 4,084 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 3,802 जलजोडण्या खंडित करण्यात आल्या, तर उपलब्ध आकडेवारीनुसार 282 जोडण्या नियमित करण्यात आल्या. शहर विभागातील 1,294 तक्रारींपैकी सर्व 1,294 जोडण्या खंडित करण्यात आल्या. पूर्व उपनगरातील 1,524 तक्रारींपैकी 1,330 जोडण्या खंडित करण्यात आल्या, तर पश्चिम उपनगरातील 1,268 तक्रारींपैकी 1,178 जोडण्या खंडित करण्यात आल्या.

अशी आहे गळतीची स्थिती

पाणी गळतीच्या 17,906 तक्रारी प्राप्त झाल्या असून यात शहर विभागात 5,375, पूर्व उपनगरात 6,513 आणि पश्चिम उपनगरात 6,018 तक्रारी आहेत.

दूषित पाण्याचाही ‘ताप’

मुंबईत दूषित पाणी पुरवठय़ाबाबत 1,514 तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्याच संख्येने तक्रारींचे निवारण केल्याची माहिती पालिकेने दिली आहे. शहरात 824, पूर्व उपनगरात 140 आणि पश्चिम उपनगरात 550 तक्रारी प्राप्त झाल्या.