शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरण, शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण; आधारवाडी कारागृहात रवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात हल्ला करून डॉक्टरांना बेदम मारहाण करणारा शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे याचा जामीन सर्वेच्च न्यायालयाने रद्द करून तीन दिवसांत पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर रमेश म्हात्रे आणि त्याचे तीन हल्लेखोर साथीदार आज पोलिसांसमोर शरण आले. कल्याण न्यायालयात या चौघांना हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात केली.

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांना मारहाण केल्याच्या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या तीन साथीदारांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू होती. या चौघांना यापूर्वी जामीन मंजूर झाला होता. मात्र राज्य सरकारने त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी सर्वेच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर सर्वेच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे याच्यासह चौघांचा जामीन रद्द केला. तसेच संबंधितांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले होते. सर्वेच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार रमेश म्हात्रे याच्यासह रमेश पवार, प्रमोद निकम आणि अक्षय कारंडे आज डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले. त्यानंतर कल्याण न्यायालयाचे न्यायाधीश संतोष आगे यांनी चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली.

नेमके प्रकरण काय?

क्षुल्लक कारणावरून 7 जुलै रोजी शास्त्रीनगर रुग्णालयातील स्त्राrरोगतज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर, डॉ. वैभव साळुंके, परिचारिका नमिता उबाळे आणि द्रव्या गिरी यांना रमेश म्हात्रे आणि त्याच्या गुंड कार्यकर्त्यांनी अश्लील शिवीगाळ करत अमानुष मारहाण केली होती. यानंतर पोलिसांनी रमेश म्हात्रे, रमेश पवार, प्रमोद उर्फ प्रकाश निकम, अक्षय कारंडे, साधना कारंडे यांना अटक केली.