
केंद्रामध्ये मोदी-शहा सत्तेत आल्यापासून निवडणूक आयोग हायजॅक झाला आहे. निवडणूक आयोग भाजपचा एजंट म्हणून काम करत आहे. पण हे जास्त दिवस चालणार नाही. हुकुमशहाला चमचेगिरी आवडते, पण आता त्यांचा अंत होण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.
काल दिल्लीत संसद भवनापासून ते निर्वाचन सदनपर्यंत विरोधी खासदारांचा अभूतपूर्व मोर्चा निघाला होता. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेससह सर्व बिगर भाजपा खासदार रस्त्यावर उतरले. विरोधी पक्षांच्या खासदारांचा मोर्चा रोखण्यासाठी बीएएसएफ, सीआरपीएफ आणि दिल्ली पोलीस असे दीड लाख जवान तैनात होते. जनतेने निवडून दिलेल्या पावणे तीनशे निश्चस्त्र खासदारांना रोखण्यासाठी हा फौजफाटा तैनात केला होता हे अत्यंत निर्दयी आहे, असे संजय राऊत म्हणाले.
मोदी-शहा, ज्ञानेश कुमार नावाच्या निवडणूक आयुक्तांविरुद्ध आमचा लढा सुरू आहे. विरोधी खासदारांची मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्याची मागणी होती. पण पावणे तीनशे खासदारांना निवडणूक आयुक्त भेटत नाहीत. मग काय फक्त मोदी-शहा आणि चोर-लफंग्यांना भेटणार का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच पावणे तीनशे खासदारांना बंदुकीच्या बळावर रोखण्यात आले हे चित्र देशातच नाही तर जगात गेले. अटक करण्यात आली, महिला खासदारांशी गैरवर्तन केले आणि रात्री साडे अकरा वाजता राहुल गांधी यांची सुटका झाली. पण हे आता आंदोलन थांबणार नाही, देशभरात याची ठिणगी पडली आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
ज्ञानेश कुमार यांना जावेच लागणार आहेत. पण या सगळ्यात अमित शहा कुठे आहेत? ते भूमिगत झाले आहेत का? मोदी यावर बोलत का नाहीत? त्यांच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाला 25 वर्षे पूर्ण झाले म्हणून दुष्काळी महाराष्ट्रात शेकडो कोटींच्या जाहिराती देण्यात आल्या आहेत. हे 400-500 कोटी वाचवले असते तर गरीब, दुष्काळी शेतकऱ्यांना काहीतरी मदत करता आली असती. पण जाहिरातबाजीवर देश, राज्य, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री चाललेले आहेत. हुकुमशहाला चमचेगिरी आवडते. पण त्याचा अंत होण्याची वेळ आली आहे, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या आधीचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार या दोघांनाही सोडले नाही पाहिजे. राजीव कुमार यांना चोरांच्या हातात शिवसेना आणि धनुष्यबाणी देण्याचे काम केले. शिवसेना, राष्ट्रवादीतून फुटलेल्या लोकांना प्रतिष्ठा देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्यासोबत राजीव कुमारही देशाचे गुन्हेगार आहेत. मोदी-शहा आल्यापासून निवडणूक आयोग हायजॅक करण्यात आला आहे. ईव्हीएम, एसआयआरद्वारे सिस्टीम हायजॅक केली आहे. पण हे जास्त दिवस चालणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
घटनात्मक पाप केलेल्या गटाला पक्षचिन्ह द्यायचे का? सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटावर प्रश्नांचा भडिमार





























































