
कुलाब्यात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला झटपट नफा कमावण्याची लालसा भलतीच महागात पडली. व्हॉट्सऍपद्वारे लिंक पाठवून सायबर गुन्हेगारांनी मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवत शेअर विकत घेण्यास भाग पाडून त्या व्यावसायिकाची चार कोटी 90 लाख रुपयांची फसवणूक केली.
दिनेश (नाव बदललेले, 56) हे कुलाबा येथे राहतात व त्यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. दिनेश यांना त्यांच्या व्हॉट्सऍपवर HSCMI Learning Academy-Q या व्हॉटस्ऍप ग्रुपचे ग्रुप ऍडमिन HSBC अनाया शर्मा नावाने तीन वेगवेगळ्या क्रमांकावरून संपर्क साधला गेला व शेअर विकत घेतल्यास कमी कालावधीत मोठा नफा कमवाल असे लालच दाखवले गेले. 10 ऑगस्ट ते 5 नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात आरोपींनी HB Ultra हे बनावट ऑप्लिकेशन तयार करून दिनेश व त्यांच्या सहकाऱयाला विविध शेअर विकत घेण्यास लावून विविध बँक खात्यात चार कोटी 90 लाख रुपये भरण्यास भाग पाडले.
दरम्यान, आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिनेश यांनी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे व पथक तपास करत आहेत.






























































