
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पी.ए. असल्याचे सांगून एक भामट्याने दोन महिलांची तब्बल 21 लाखांची फसवणूक केल्याची घटना भाईंदरमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात भामटय़ाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळशीदास जाधव (40) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
भाईंदर पश्चिमेकडील फाटक रोड परिसरात राहणाऱ्या मीना जैन यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. तुळशीदास जाधव याने सर्वप्रथम तक्रारदार मीना जैन यांचे वडील प्रेमचंद यांच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर त्याने स्वत: अजित पवार यांचा पी.ए. असल्याचे सांगितले.
माझे मंत्रालयात मोठे वजन असून आजवर अनेक लोकांना मी सरकारी नोकरी लावून दिली आहे, असा बनाव रचून त्याने तक्रारदारांचा विश्वास संपादन केला. यानंतर जाधव याने मीना जैन व त्यांची मैत्रीण रेशु दुबे या दोघींना शासकीय शाळेत शिक्षक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. दोघींकडून बँक खात्याद्वारे वेळोवेळी तब्बल 21 लाख 46 हजार 876 रुपये उकळले. बराच काळ लोटल्यानंतरही शासकीय नोकरी न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात आरोपी तुळशीदास जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पर्यटकांची फसवणूक करणाऱ्याला अटक
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विहित दरापेक्षा अधिक दराच्या तिकिटाची विक्री करणाऱयाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. मंगळवारी एका पर्यटकाने फाटलेली तिकिट विक्री केल्याची तक्रार केली. त्यानंतर आकाशकडील 9 तिकिटांची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे लक्षात आले. याची माहिती पोलिसांना दिले असता त्यांनी आकाशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते बनावट तिकीट गणेश ठाकूर याने बनवून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.






























































