
नाना पाटेकर हे सशक्त, सामर्थ्यवान, दमदार व रांगडे अभिनेते होते. फिल्मी दुनियेत प्रचंड यश मिळवूनही त्यांच्यातील साधा माणूस त्या पंचतारांकित दुनियेत रमला नाही. कुठलाही बडेजाव नाही. ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी व परखड वाणी’ हे ब्रीद त्यांनी सदैव जपले. आपली भरलेली ओंजळ शेतकऱ्यांसाठी रिती करणारे नाना पाटेकर म्हणजे खऱ्या अर्थाने सुपरस्टार होते. काम संपले की पुण्याजवळील डोणजे गावच्या शेतातील घरात रमायला त्यांना आवडत असे. त्याच आवडत्या ठिकाणी त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. नाना पाटेकर यांच्या अभिनयात रग होती, धग होती, रुबाब होता, दरारा होता. कुठल्याही भूमिकेत प्राण फुंकणाऱ्या नाना पाटेकरांचा देह आज निष्प्राण झाला आहे यावर विश्वास बसत नाही. काळजाला भिडणारा असा ‘नटसम्राट’ पुन्हा होणे नाही!
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी अकस्मातच जगाचा निरोप घ्यावा हे पटण्यासारखे नाही. गुरुवारची सकाळ नाना पाटेकर यांच्या निधनाची धक्कादायक वार्ता घेऊन उगवली. नानांचे अचानक जाणे हा सामान्य धक्का नाही. संपूर्ण कलाविश्वाला बसलेला तो हादरा आहे. नाना पाटेकर हे नट किंवा अभिनेते म्हणून तर मोठे होतेच; पण त्याहीपेक्षा एक विशाल हृदयाचा माणूस म्हणून ते अधिक मोठे होते. निष्ठूर काळाने त्यांचे हेच विशाल हृदय हृदयविकाराच्या झटक्यासाठी निवडले. ज्या माणसाचे हृदय सदैव समाजासाठी धडधडत होते, त्या हृदयाची धडधड कायमची बंद करून देवाला काय मिळाले? वयाने जरूर पंचाहत्तरी पूर्ण केली होती, पण अंगकाठीने धडधाकट असलेल्या नानांच्या आसपास वृद्धत्वाच्या खुणा कधी फिरकल्या नाहीत. शिवाय नियमित व्यायाम, अंगमेहनत होतीच. नाना पाटेकरांना त्यांच्या चाहत्यांनी सदैव पाहिले ते तडफदार रूपातच. त्यामुळेच नानांचे असे तडकाफडकी जाणे कुणाच्याही मनाला पटत नाही. गोव्यातील घरी मध्यरात्री हृदयविकाराचा त्रास सुरू झाला तेव्हा दुर्दैवाने कोणी सोबत नव्हते; अन्यथा वेळीच उपचार मिळाले असते आणि लढवय्या नानांनी मृत्यूचे हे आक्रमणही नक्कीच परतवून लावले असते. नानांचे प्रारंभिक जीवन हलाखीचे होते, पण परिस्थितीचे भांडवल करून कुढत बसण्यापेक्षा वयाच्या 13 व्या वर्षापासूनच नानांनी अभिनयासोबत जगण्याचाही संघर्ष सुरू केला. बालवयातच रंगमंचावर पदार्पण केल्यानंतर प्रख्यात दिग्दर्शिका विजया मेहता व सुलभा देशपांडे यांनी नानांमधील अभिनय गुण हेरले आणि एकांकिकांपासून त्यांचा रंगभूमीचा प्रवास प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांपर्यंत पोहोचला. जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’ या नाटकात नाना पाटेकर यांनी गुलाबराव नावाच्या एका क्रूर व शोषक पुढाऱ्याची भूमिका केली होती. खलनायकाची ही भूमिका नाना इतक्या जिवंतपणे करत की, हा अभिनय आहे हे माहीत असूनही रसिक-प्रेक्षकांच्या तळपायाची आग मस्तकात जात असे. याच नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान एका प्रेक्षकाने त्यांना चप्पल भिरकावून मारली होती. नाना पाटेकर यांनी रंगवलेल्या खलनायकाला मिळालेली ती
‘सर्वोच्च दाद’
होती. तब्बल 16 वर्षे नाना पाटेकर यांनी ‘पुरुष’ या नाटकात काम केले व देश-विदेशात या नाटकाचे 1800 हून अधिक प्रयोग झाले. ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकात नाना यांनी साकारलेली ‘सत्तार’ नावाच्या दलालाची भूमिकाही प्रचंड गाजली. ‘गुलाबराव’ आणि ‘सत्तार’ या दोन्ही भूमिका नाना पाटेकर यांच्या रंगभूमीवरील कारकीर्दीतील सर्वात शक्तिशाली व अजरामर भूमिका मानल्या जातात. 1978 मध्ये ‘गमन’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यापासून तब्बल पाच दशके एक दमदार व सामर्थ्यवान अभिनेता म्हणून नाना पाटेकर यांनी फिल्म इंडस्ट्रीत राज्य केले. नाना पाटेकर यांना खरी ओळख मिळवून दिली ती एन. चंद्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अंकुश’ या चित्रपटाने. रवींद्र केळकर या बेरोजगार तरुणाचे पात्र रंगवताना बेकारी, नैराश्य आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या तरुणाचा संताप नाना पाटेकरांनी या भूमिकेतून मांडला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. ही भूमिका प्रचंड गाजली आणि तिथूनच नानांनी हिंदी चित्रपटसृष्टीत भरारी घेतली. अभिनयातील सहजता आणि संवादफेकीचे अद्भुत कौशल्य ही नाना पाटेकर यांची बलस्थाने होती. ‘परिंदा’ या सुपरहिट चित्रपटात त्यांनी ‘अण्णा’ या अत्यंत हिंसक, निर्दयी आणि क्रूर गँगस्टरची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. नानांच्या भात्यामधील सर्वात प्रभावी शस्त्र होते ते वेगवान संवादफेकीचे. त्यामुळे त्यांच्या डायलॉग्जची एक व्रेझच निर्माण झाली. ‘क्रांतिवीर’मधील ‘ये मुसलमान का खून, ये हिंदू का खून…’ आणि ‘आ गए मेरी मौत का तमाशा देखने…’ या संवादांनी रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. ‘खामोशी’ या चित्रपटात ऐकू व बोलू न शकणाऱया मूकबधिर पित्याचे पात्र रंगवताना नाना पाटेकर यांनी या भूमिकेत जो जीव ओतला तो थक्क करणारा आहे. आपल्यातील अभिनय कौशल्याला एका विशिष्ट चौकटीत त्यांनी कधीच बंदिस्त केले नाही. गंभीर व
आक्रमक आणि संवेदनशील
भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकर यांनी ‘वेलकम’सारख्या चित्रपटातून उदय शेट्टी या अंडरवर्ल्ड डॉनची विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवले. नानांचे चित्रपट व त्यांचा अभिनय केवळ देशप्रेमापुरता मर्यादित नव्हता, तर कारगील युद्धात आपल्या सैन्यासोबत ते प्रत्यक्ष लढाईत उतरले होते. त्याआधी नानांनी घेतलेले लष्करी प्रशिक्षण आणि त्यांचे नेमबाजीतील कौशल्य पाहून तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यांना लढाईत उतरण्याची परवानगी दिली होती. सीमेवर लढणारा ‘जवान’ आणि शेतात राबणारा ‘किसान’ या दोन्हीविषयी त्यांच्या मनात प्रचंड जिव्हाळा होता. 2015 चा भीषण दुष्काळ पाहून नाना पाटेकर यांचे काळीज विदीर्ण झाले. दीड कोटी रुपयांची लक्झरी गाडी घेण्याचा निर्णय रद्द करून नाना पाटेकर यांनी ही रक्कम असंख्य शेतकरी कुटुंबांत वाटून दिली. ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात मोठे काम केले. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नाना पाटेकर यांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली. बालपणी गरिबीशी कराव्या लागलेल्या संघर्षाची जाणीव नाना पाटेकर यांनी मनात कायम जपली. गोव्यात केलेल्या अखेरच्या भाषणात ‘मी उद्या आहे की नाही माहीत नाही, पण त्याआधी म्हणजे मृत्यूपूर्वी मी समाजासाठी काय करू शकतो’, हाच विचार त्यांनी मांडला. नाना पाटेकर हे सशक्त, सामर्थ्यवान, दमदार व रांगडे अभिनेते होते. फिल्मी दुनियेत प्रचंड यश मिळवूनही त्यांच्यातील साधा माणूस त्या पंचतारांकित दुनियेत रमला नाही. कुठलाही बडेजाव नाही. ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी व परखड वाणी’ हे ब्रीद त्यांनी सदैव जपले. आपली भरलेली ओंजळ शेतकऱ्यांसाठी रिती करणारे नाना पाटेकर म्हणजे खऱ्या अर्थाने सुपरस्टार होते. काम संपले की पुण्याजवळील डोणजे गावच्या शेतातील घरात रमायला त्यांना आवडत असे. त्याच आवडत्या ठिकाणी त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. नाना पाटेकर यांच्या अभिनयात रग होती, धग होती, रुबाब होता, दरारा होता. कुठल्याही भूमिकेत प्राण फुंकणाऱ्या नाना पाटेकरांचा देह आज निष्प्राण झाला आहे यावर विश्वास बसत नाही. काळजाला भिडणारा असा ‘नटसम्राट’ पुन्हा होणे नाही!






























































